नेवाळी आंदोलनप्रकरणी २ हजार जणांवर गुन्हे
By admin | Published: June 25, 2017 02:31 AM2017-06-25T02:31:47+5:302017-06-25T02:31:47+5:30
नेवाळीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाप्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत दोन हजारांहून अधिक गावकऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण/उल्हासनगर : नेवाळीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाप्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत दोन हजारांहून अधिक गावकऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून चार तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या आंदोलनात दीड कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा ठपका पोलिसांनी आंदोलकांवर ठेवला आहे.
दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ब्रिटिशांनी घेतलेल्या शेतजमिनी परत कराव्यात, या मागणीसाठी स्थानिक शेतकऱ्यांनी गुरुवारी आंदोलन केले होते. पण या आंदोलनाला हिंसक वळण लागले. उल्हासनगरचे हिललाइन पोलीस ठाणे, डोंबिवलीचे मानपाडा पोलीस ठाणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. ठार मारण्याचा प्रयत्न, त्या उद्देशाने मारहाण, पोलिसांसह खासगी गाड्यांची जाळपोळ, पेट्रोल बॉम्बचा वापर, सरकारी कामात अडथळा आणणे, महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग, हाणामारी, शस्त्र बाळगणे आदी गुन्हे हिललाइन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. या आंदोलनात शेतकऱ्यांनी वाहने जाळली, तोडफोड केल्याने एक कोटी ५७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा पोलिसांनी केला आहे.
पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात दोन साहाय्यक पोलीस निरीक्षक, एक पोलीस नाईक सरकारी फिर्यादी आहेत. जमीन बचाव आंदोलन समितीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शेतकरी व तरुण कार्यकर्त्यांनी पूर्वनियोजित पद्धतीने आंदोलनाला हिंसक वळण दिले. ठार मारण्याच्या उद्देशाने पोलिसांना मारहाण केली.
स्फोटक साहित्य आणि हत्यारे घेऊन आंदोलन हिंसक केल्याचा आरोप या गुन्ह्यांत करण्यात आला आहे. कट रचणे, शांतताभंग करणे, दंगल करणे, क्रिमिनल अॅक्ट, मुंबई पोलीस अॅक्टद्वारे हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अंबरनाथमधून चौघांना पकडले
नेवाळी पाड्यातील दीड हजार आणि भाल गावातील ४०० ते ५०० जणांविरुद्ध गुन्हे
नोंदवले आहेत. त्यात या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या जमीन बचाव आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांचा समावेश आहे. गुन्हा दाखल केलेल्यांपैकी चार जणांना अंबरनाथच्या रासायनिक कारखान्यात काम करताना तेथे जाऊन पोलिसांनी ताब्यात घेतले. विशाल सोरखादे, कुंदन म्हात्रे, योगेश म्हात्रे, आकाश म्हात्रे अशी त्यांची नावे आहेत.