पाच वर्षे होऊनही शेतकऱ्यांवर गुन्हे
By admin | Published: August 9, 2016 01:47 AM2016-08-09T01:47:59+5:302016-08-09T01:47:59+5:30
मावळ गोळीबाराला ५ वर्षे सोमवारी पूर्ण झाली. मात्र, बंद जलवाहिनी प्रकल्प रद्द करण्याची आणि आंदोलनातील शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे युतीच्या नेत्यांनी दिलेले
पवनानगर : मावळ गोळीबाराला ५ वर्षे सोमवारी पूर्ण झाली. मात्र, बंद जलवाहिनी प्रकल्प रद्द करण्याची आणि आंदोलनातील शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे युतीच्या नेत्यांनी दिलेले आश्वासन त्यांचे सरकार येऊनही अद्याप पूर्ण केल नाही.
पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहराला बंद जलवाहिनीतून पाणी नेण्यासाठी मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध करण्यासाठी ९ आॅगस्ट २०११ रोजी मुंबई-पुणे महामार्गावर रस्ता रोको करून आंदोलन केले होते. या आंदोलनात भाजपा, शिवसेना, आरपीआय, काँग्रेस हे राजकीय पक्षही सहभागी होते. हे आंदोलन थांबवण्यासाठी पोलीस व आंदोलनकर्ते यात खटका उडाला व हे आंदोलन चिघळले. यातून पोलिसांनी गोळीबार केला. त्यात कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे व श्याम तुपे हे तीन शेतकरी मृत्युमुखी पडले.
या घटनेनंतर त्या काळातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य सरकारने आंदोलनात शहीद झालेल्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरीत घेण्याचे आश्वासन दिले होते. खूप उशिराने त्या तीन कुटुंबांतील प्रत्येकी एकेका व्यक्तीला महापालिकेत नोकरी देण्यात आली आहे. आंदोलन काळात शेतकऱ्यांवर ३०७सारखे गंभीर गुन्हे नोंदवले गेले आहेत. युती शासन आल्यानंतर हे गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन निवडणूक प्रचारात युतीच्या नेत्यांनी दिले होते. बंद जलवाहिनी प्रकल्प कायमचा रद्द करू, असेही सांगितले होते. मात्र, युती शासन सत्तेत येऊन २ वर्षे होत आली, तरी प्रकल्प रद्दची घोषणा झालेली नाही. शेतकऱ्यांवरील गुन्हेही मागे घेण्यात आलेले नाहीत.