अध्यक्षासह पाच जणांविरुद्ध गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2015 01:55 AM2015-07-20T01:55:45+5:302015-07-20T01:55:45+5:30

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांप्रकरणी अखेर महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार

Crime against five people with president | अध्यक्षासह पाच जणांविरुद्ध गुन्हे

अध्यक्षासह पाच जणांविरुद्ध गुन्हे

googlenewsNext

यदु जोशी , मुंबई
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांप्रकरणी अखेर महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार रमेश कदम यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
‘लोकमत’ने वृत्त मालिकेद्वारे महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याची पाळेमुळे खणून काढली होती. घोटाळ्यातील प्रमुख दोषींवर गुन्हे दाखल करून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) ‘लोकमत’च्या रोखठोक भूमिकेवर एकप्रकारे शिक्कामोर्तबच केले.
गुन्हे दाखल करण्यात आलेल्यांमध्ये महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम यांच्यासह महामंडळाचे निवृत्त व्यवस्थापकीय संचालक संतोष इंगळे, निलंबित व्यवस्थापकीय संचालक श्रावण किसन बावणे, नमिता कदम आणि लक्ष्मी लोखंडे यांचा समावेश असून, त्यांच्यावर भादंविच्या कलम ४६२ ते ४७१ तसेच १२० (ब), ४२० आणि ३४ कलमांतर्गत दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले.
या संपूर्ण प्रकरणाची सर्वंकष चौकशी केल्यानंतर सीआयडीच्या कोकण विभागाने दहिसर ठाण्यात शनिवारी रात्री कदम आणि इतरांविरुद्ध तक्रार
दाखल करण्यात आली होती.
महामंडळाची आर्थिक फसवणूक करणे, त्यासाठी संगनमत करणे, महामंडळाचे नुकसान करणे आदी आरोप त्यांच्यावर निश्चित करण्यातआले आहेत. साठे महामंडळातील गैरव्यवहाराच्या तक्रारी आल्यानंतर सरकारने सीआयडीकडे तपास सूर्पद केला होता. त्यानुसार सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी धाडी टाकून घोटाळ्याची कागदपत्र हस्तगत केली. कदम आणि कंपूने केलेल्या भ्रष्टाचाराची माहिती पाहून सीआयडीची यंत्रणादेखील चक्रावून गेली. स्वत: अध्यक्ष असलेल्या तीन संस्थांना कदम यांनी महामंडळाकडून १४२ कोटी रुपये मिळवून दिले, राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या ३८ मतदारसंघांमध्ये महामंडळाचे प्रत्येकी पाच कोटी या प्रमाणे १९० कोटी रुपयांची मातंग महिला समृद्धी योजनेंतर्गत खैरात वाटण्यात आली. यात शेकडो बोगस प्रकरणे तयार करून पैसा लाटण्यात आला. कुठलेही अर्ज न मागविता, परीक्षा न घेता ९० कर्मचाऱ्यांना महामंडळात अवैधरीत्या नोकरी देण्यात आली. नोकरी देताना ६० कर्मचाऱ्यांकडून २० लाख रुपये घेण्यात आले. औरंगाबाद येथे जमीन खरेदी करताना महामंडळाकडून १२.५० कोटी रुपये घेऊन जमीन मात्र काही लाखातच खरेदी करण्यात आली. दोन एकर जमिनीपैकी दीड एकर जमीन रमेश कदम यांच्या नावावरच आहे. मंडळाच्या सहा जिल्हा कार्यालयांतून तब्बल ८६ कोटी रुपये आरटीजीस आणि बेअरर चेकद्वारे काढण्यात आले , अशा एक ना एक आरोपांनी हे महामंडळ वादाच्या भोवऱ्यात सापडले. त्यातच चारचाकी गाड्या वाटप घोटाळा समोर आला. या शिवाय ५९ जणांना तब्बल १० कोटी रुपयांच्या गाड्या वाटण्यात आल्या. महागाई भत्त्याची थकबाकी देताना झालेले घोटाळे, रोजंदारीवर लागलेल्या कर्मचाऱ्यांना एकदम उपमहाव्यवस्थापक करणे असे अनेक प्रकार घडले. लोकमतने प्रत्येक अन् प्रत्येक घोटाळ्याचा पर्दाफाश केला. (पान ४ वर)

Web Title: Crime against five people with president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.