कृष्णा हॉस्पिटलविरुद्ध गुन्हा
By admin | Published: September 18, 2016 12:37 AM2016-09-18T00:37:38+5:302016-09-18T00:37:38+5:30
योग्य उपचार न दिल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याप्रकरणी कोथरूडच्या कृष्णा हॉस्पिटलविरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
पुणे : योग्य उपचार न दिल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याप्रकरणी कोथरूडच्या कृष्णा हॉस्पिटलविरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉस्पिटलच्या डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांवर नातेवाइकांनी निष्काळजणीपणाचा आरोप केला आहे.
सतीश अंकुश मोहोळ असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. संतोष अंकुश मोहोळ (वय ३८, रा. केळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश यांच्या छातीत दुखू लागल्यावर त्यांना कृष्णा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांचा ईसीजी केला नाही. त्यांना केवळ गॅसेसचा त्रास असल्याचे सांगत इंजेक्शन व औषधे देऊन घरी पाठवून दिले. घरी गेल्यावर त्यांना पुन्हा त्रास सुरू झाला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
संतप्त नातेवाइकांनी रुग्णालयाबाहेर गोंधळ घालत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले पाटील यांनी दिली.
दरम्यान, रुग्णालयाच्या काचा फोडण्यात आल्या असल्याचेही निदर्शनास आले. रुग्णालयाने मात्र आपली कोणाविरुद्धही तक्रार नसून गर्दीमुळे काचा फुटल्याचे पत्र पोलीस ठाण्याला दिले आहे. (प्रतिनिधी)