सिंचनप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा
By admin | Published: March 31, 2016 01:54 AM2016-03-31T01:54:40+5:302016-03-31T01:54:40+5:30
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळअंतर्गत मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील पुच्छ शाखा कालव्याचे मातीकाम व बांधकामाच्या निविदा प्रक्रियेदरम्यान झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी
नागपूर : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळअंतर्गत मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील पुच्छ शाखा कालव्याचे मातीकाम व बांधकामाच्या निविदा प्रक्रियेदरम्यान झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यात तीन अधिकारी व कंत्राटदार कंपनीचे संचालक आणि त्यांचे भागीदार यांचा समावेश आहे.
सेवानिवृत्त मुख्य अभियंता सोपान रामराव सूर्यवंशी (६५) रा. मल्हार प्लॉट नं.२१ सहकारनगर उस्मानपुरा औरंगाबाद, गोसीखुर्द डावा कालवा वाही पवनीचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता उमाशंकर वासुदेव पर्वते (५९) रा. सरस्वतीनगर मानेवाडा रिंगरोड, वरिष्ठ विभागीय लेखाधिकारी चंदन तुळशीराम जिभकाटे (५७) रा. आयुर्वेदिक ले-आऊट उमरेड रोड या अधिकाऱ्यांसह कंत्राटदार आर.जे शाह अॅण्ड कंपनी लि. मुंबईच्या संचालिका कालिंदी राजेंद्र शाह (६७), तेजस्विनी राजेंद्र शाह (६४), त्यांचे भागीदार डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीचे संचालक विशाल प्रवीण ठक्कर (३६), प्रवीण नाथालाल ठक्कर (६७), जिगर प्रवीण ठक्कर (३८), अरुण कुमार गुप्ता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्याच्या गृहविभागाने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरअंतर्गत सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहारासंदर्भात उघड चौकशी करण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) दिले आहेत. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या नेतृत्त्वाखाली ही चौकशी सुरूआहे.
सिंचन घोटाळा कारवाई
एसीबीचे अधीक्षक संजय दराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील पुच्छ शाखा कालव्याच्या निविदा प्रक्रियेदरम्यान विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांनी २००९मध्ये निविदा मागविल्या होत्या. त्यावेळी चार कंत्राटदार कंपन्यांनी या निविदा प्रक्रियेमध्ये भाग घेतला, असे दाखविण्यात आले होते. त्यात आर. जे. शाह अॅण्ड कंपनी आणि डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रा.लि. (जे.व्ही) यांना या कालव्याच्या कामाचे कंत्राट देण्यात आले.
चौकशीमध्ये आर.जे. शाह अॅण्ड कंपनी लि. आणि डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रा. लि. (जे.व्ही) व इतरांनी ही निविदा प्रक्रिया स्पर्धात्मक झाल्याचे दाखविण्याकरिता ठक्कर परिवाराचेच एस. एन. ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रा.लि. या कंपनीने प्रक्रियेत भाग घेतला. श्रीनिवासा कन्स्ट्रक्शनच्या निविदेसोबत भरावयाची बयाणा रक्कम डी. कन्स्ट्रक्शन्स प्रा.लि. या कंपनीच्या बँक खात्यातून भरण्यात आली. डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या भागीदाराने खोटी माहिती सादर केल्याचे आढळले.