शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यासह आंदोलक कार्यकर्त्यांवर बारामतीत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 04:06 PM2020-08-28T16:06:36+5:302020-08-28T16:17:36+5:30
दूध दरवाढीसाठी बारामतीत काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये प्राण्यांचे हाल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल..
बारामती : जमावबंदी कायद्याचे उल्लंघन करत दूध दरवाढीसाठी बारामतीत आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी वकार्यकर्त्यांवर बारामतीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवरजिल्हाधिकाऱ्यांनी एकत्रित जमाव जमवू नये, असे आदेश दिले असताना त्याचे उल्लंघन करत, मोर्चाला परवानगी नाकारली होती. मोर्चामध्ये प्राण्यांचे हाल केल्याप्रकरणी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह प्रमुख ११ आयोजक व अन्य ४० ते ५० जणांविरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस कर्मचारी ओंकार कैलास सिताप यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार माजी खासदार राजू शेट्टी, अमरसिंह कदम (रा. हिंगणेवाडी, ता. इंदापूर), विलास विनायक सस्ते (रा.खांडज, ता. बारामती), महेंद्र जयसिंग तावरे (रा. सांगवी, ता. बारामती),विकास उर्फ नानजी बाबर (रा. पिंपळी, ता. बारामती), धनंजय महामुलकर (रा.फलटण, जि. सातारा), सचिन खानविलकर (रा. नामवैभव टॉकिज शेजारी, फलटण, जि.सातारा), डॉ. राजेंद्र घाडगे (रा. चौधरवाडी, ता. फलटण), बाळासो शिपकुले,सिवाजी सोडमिसे (दोघे रा. सोमंथळी, ता. फलटण), राजाभाऊ कदम (रा. दौंड शुगर कारखान्याजवळ, ता. दौड), बुधम मशक शेख (रा. सणसर, ता. इंदापूर) वअन्य ४० ते ५० स्वाभिमानीचे कार्यकर्ते यांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. साथीचे रोग प्रतिबंध अधिनयम, प्राण्यांचे अत्याचारापासून संरक्षण अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी(दि. 27) रोजी ही घटना घडली.फिर्यादीत नमूद केल्यानुसार फिर्यादी याला स्वाभिमानीच्या दूध दरवाढ आंदोलनाची माहिती सोशल मीडियाद्वारे तसेच वरिष्ठ कार्यालयाकडून समजली. त्यानुसार बारामती शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांमार्फत योग्य तो बंदोबस्त लावण्यात आला. दुपारी एकच्या सुमारास स्वाभिमानीचे अध्यक्ष शेट्टी व त्यांचे कार्यकर्ते शारदाप्रांगणाजवळ एकत्र जमले. शेख यांनी एमएच-४२, एम-७४७१ या पिकअप वाहनातून तीन गायी दाटीवाटीने बसवून मोचार्साठी आणल्या. कार्यकर्त्यांच्या तोंडाला मास्क नव्हते. त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही. दूध दरवाढीसंबंधी मोठमोठ्याने घोषणा देण्यात येत होत्या.
पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी मोर्चाला परवानगी नाकारल्याची नोटीस राजू शेट्टी यांना बजावली. मोर्चा काढू नये, असेही सांगितले. तरीदेखील मोर्चा काढण्यात आला.मोर्चाच्या पुढील बाजूस दोन गायी दोरीने ओढत प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. प्रशासकीय इमारतीच्या गेटसमोर बेकायदा गर्दी, जमाव जमवत घोषणाबाजी करण्यात आली. तसेच भाषणे झाली. त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मोर्चा व सभेदरम्यान रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण करण्यात आला. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. कोरोना विषाणूच्या स्थितीत हयगयीचे व मानवी जीवितास धोका निर्माण होईल अशी घातकी कृती करण्यात आली. प्राण्यांना क्रूरतेची वागणूक देण्यात आली. मोर्चा संपल्यानंतर वरिष्ठांशी चर्चा करून फिर्याद देण्यात आल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.
-------------------------