रमेश पाटील व त्यांच्या दोन भावांवर गुन्हा
By Admin | Published: December 23, 2016 04:56 AM2016-12-23T04:56:06+5:302016-12-23T04:56:06+5:30
काटई येथील शिवसेनेचे कार्यकर्ते तथा बांधकाम व्यावसायिक अमित पाटील यांचे अंगरक्षक विकी ऊर्फ विवेक शर्मा (३९) यांच्या
डोंबिवली : काटई येथील शिवसेनेचे कार्यकर्ते तथा बांधकाम व्यावसायिक अमित पाटील यांचे अंगरक्षक विकी ऊर्फ विवेक शर्मा (३९) यांच्या हत्येसंदर्भात माजी आमदार रमेश पाटील, मनसेचे सचिव राजू पाटील व त्यांचे बंधू विनोद पाटील यांच्याविरोधात संशयित आरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना लागलीच अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीकरिता शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी मानपाडा पोलीस ठाण्यावर मोर्चा नेण्यात आला. संतप्त शिवसैनिकांनी रुग्णवाहिकेतून विवेकचा मृतदेह सोबत आणला होता. तब्बल तीन तास शिवसैनिकांनी आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी ठोस कारवाईचे आश्वासन दिल्यावर विवेकवर अंत्यसंस्कार केले.
बुधवारी दुपारी दोन अनोळखी मारेकऱ्यांनी अमित पाटील समजून केलेल्या गोळीबारात अंगरक्षक विवेकचा मृत्यू झाला, असा पाटील यांचा दावा आहे. यासंदर्भात पोलिसांनी रमेश पाटील, राजू पाटील व विनोद पाटील यांच्यावर संशयित आरोपी म्हणून गुन्हा दाखल केला आहे. आरोपींवर तातडीने कारवाई करण्याच्या मागणीकरिता खासदार डॉ. शिंदे, आमदार सुभाष भोईर, बालाजी किणीकर, महापौर राजेंद्र देवळेकर, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, सभागृह नेते राजेश मोरे, शहरप्रमुख विद्याधर भोईर यांच्यासह नगरसेवक व शेकडो शिवसैनिकांनी गुरुवारी सकाळी मानपाडा पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. (प्रतिनिधी)