डोंबिवलीतील सहा शिवसैनिकांवर गुन्हे
By admin | Published: June 20, 2017 02:26 AM2017-06-20T02:26:46+5:302017-06-20T02:26:46+5:30
मराठी भाषेतच दुकानदारांनी फलक लावावेत, यासाठी केलेल्या आंदोलनप्रकरणी डोंबिवली शिवसेना शहरप्रमुखांसह सहा जणांविरोधात रामनगर पोलिसांनी तीन
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : मराठी भाषेतच दुकानदारांनी फलक लावावेत, यासाठी केलेल्या आंदोलनप्रकरणी डोंबिवली शिवसेना शहरप्रमुखांसह सहा जणांविरोधात रामनगर पोलिसांनी तीन महिन्यांनंतर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजार राहण्याची नोटीस बजावली आहे.
पोलिसांनी शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी, परिवहन सभापती संजय पावशे, उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, उपशहरप्रमुख किशोर मानकामे, महिला संघटक कविता गावंड आणि प्रवीण गोरे यांच्याविरोधात विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले. तसेच त्यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.
शिवसैनिकांनी कोणतीही परवानगी न घेता, कुरिअर कंपनीत प्रवेश करून सूचना फलकावर शाई फासली, तसेच सामानाचे नुकसान केल्याने नोटीस बजावल्याचे रामनगर पोलिसांनी सांगितले. कंपनीच्या व्यवस्थापकाची तक्रार नसतानाही केवळ राजकीय व्यक्तींनीदबाव टाकून गुन्हा दाखल करण्यास भाग पाडल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.
शहरप्रमुख भाऊ चौधरी म्हणाले की, भाजपा सत्तेचा गैरवापर करत आहे. काँग्रेसच्या राजवटीत सेनेने अनेक आंदोलने केली, पण असे गुन्हे दाखल झाले नाहीत. आता पुन्हा शिवसैनिकांना टार्गेट केले जात आहे.