स्नॅपडीलविरोधात गुन्हा
By admin | Published: May 2, 2015 04:43 AM2015-05-02T04:43:51+5:302015-05-02T04:43:51+5:30
आॅनलाइन औषधविक्री करणाऱ्या स्नॅपडील.कॉम साइटविरोधात अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. भारतातील अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे
मुंबई : आॅनलाइन औषधविक्री करणाऱ्या स्नॅपडील.कॉम साइटविरोधात अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. भारतातील अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे. अशा साइट्सवर वॉच ठेवण्यासाठी आता एका नव्या सेलची स्थापना करण्यात आल्याचे एफडीएचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले.
स्नॅपडीलसोबत फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि केमिस्ट आॅनलाइन या साइटची झाडाझडती एफडीएने सुरू केली आहे. स्नॅपडीलविरोधात दाखल झालेल्या तक्रारीतील तथ्यता पडताळण्यासाठी २२ एप्रिलला एफडीएच्या एका कर्मचाऱ्याने आय पिल आणि अनवॉण्टेड ७२ या गर्भनिरोधक गोळ्या मागवून पाहिल्या. मागणीप्रमाणे स्नॅपडीलच्या माध्यमातून या गोळ्या २४ एप्रिलला कर्मचाऱ्याला पोच केल्या. यातून अजूनही औषधांची विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले. लगेचच एफडीएने विनापरवाना आॅनलाइन औषधे विकणे, आक्षेपार्ह जाहिरात प्रसारित करणे यासाठी औषध आणि सौंदर्यप्रसाधन कायद्यांतर्गत कलम १८ ए, १८ (सी) अन्वये स्नॅपडीलच्या सीईओ आणि संचालकाविरोधात गुन्हा दाखल केला.
स्नॅपडीलसोबत ही औषधे पुरविणारे व्यापारी आणि कुरिअर कंपनीवरही कारवाई करण्याचे संकेत एफडीएने दिले आहेत.