युनायटेड इन्शुरन्सच्या दहा जणांविरुद्ध गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2016 04:32 AM2016-12-24T04:32:07+5:302016-12-24T04:32:07+5:30
येथील युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या शाखेतील दोन कर्मचाऱ्यांसह अन्य आठ एजंट आणि वाहनधार
लातूर : येथील युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या शाखेतील दोन कर्मचाऱ्यांसह अन्य आठ एजंट आणि वाहनधारकांविरुद्ध सीबीआयने न्यायालयात गुन्हे दाखल केले आहेत. अपघात झाल्यानंतर मागील तारखेने वाहनांचा विमा उतरवून कंपनीची फसवणूक केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग, अर्थात सीबीआयच्या वेबसाईटवर काढण्यात आलेल्या बुलेटीननुसार, लातूर जिल्ह्यातील १६ वाहनांचा विमा चुकीच्या पद्धतीने देऊन ३ कोटी २५ लाख रुपयांचा घोटाळा केला गेला आहे. २००९ ते २०१४ या काळात जिल्ह्यातील १६ अपघातग्रस्त वाहनांना विमा नसतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे मागील तारखेने कर्मचाऱ्यांनी विमा उतरवून दिला होता. या बेकायदेशीर कामामुळे कंपनीचे सव्वा तीन कोटींचे नुकसान केल्याचा दोन कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवला आहे. त्यांच्यासह या प्रकरणात गुंतलेल्या एजंट आणि वाहनधारकांचा समावेशही असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)