यू ट्यूब चॅनेलविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 01:35 AM2018-04-20T01:35:14+5:302018-04-20T01:35:14+5:30
खोटे व्हिडिओ अपलोड करून दिवंगत मोतीलाल नेहरूंपासून ते दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यापर्यंतच्या प्रमुख काँग्रेस नेत्यांबाबत या चॅनेलवरून जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात आहे.
लोणी (जि. अहमदनगर) : गांधी-नेहरू परिवारासह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांबाबत खोटी, निराधार, द्वेषमूलक माहिती प्रसारित करून बदनामी केल्याप्रकरणी एका यू ट्यूब चॅनेलविरुद्ध विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरून गुरुवारी लोणी (ता. राहाता) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खोटे व्हिडिओ अपलोड करून दिवंगत मोतीलाल नेहरूंपासून ते दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यापर्यंतच्या प्रमुख काँग्रेस नेत्यांबाबत या चॅनेलवरून जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात आहे. चॅनेलने अपलोड केलेल्या एका व्हिडिओत काँग्रेस पक्ष व पक्षातील प्रमुख नेत्यांबाबत धादांत खोटी, निराधार, द्वेषमूलक माहिती प्रसारित करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. अत्यंत हीन दर्जाची भाषा वापरून गांधी-नेहरू परिवाराची बदनामी केली जात आहे, असे विखे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
विखे पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम १५३ अ, २९५ अ नुसार सामाजिक तेढ निर्माण करणे, धर्म, वंश, जन्मस्थान, निवास आदी कारणांवरून शत्रुत्व वाढविणे, कोणत्याही धर्माच्या किंवा धार्मिक श्रद्धांचा अवमान करण्याच्या कारणावरून यू ट्यूब चॅनेलविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
- रणजित गलांडे, पोलीस निरीक्षक