बदली रॅकेटप्रकरणी गुन्हे शाखेचे पथक दिल्लीला
By Admin | Published: June 6, 2017 06:09 AM2017-06-06T06:09:18+5:302017-06-06T06:09:18+5:30
बदली रॅकेटप्रकरणाच्या अधिक चौकशीसाठी मुंबई गुन्हे शाखेची तीन पथके दिल्लीला रवाना झाली आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बदली रॅकेटप्रकरणाच्या अधिक चौकशीसाठी मुंबई गुन्हे शाखेची तीन पथके दिल्लीला रवाना झाली आहेत. त्यामुळे दिल्लीतून आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.
महानंद डेअरीचा महाव्यवस्थापक विद्यासागर हिरमुखे याच्यासह दिल्लीचा रवींद्रसिंग मोहबतसिंग यादव उर्फ शर्मा, पुण्याचा विशाल उंबळे, सोलापूरचा किशोर माळी, पुण्यातील कमलेश कानडे गुन्हे शाखेच्या कोठडीत आहेत. त्यांच्या कॉल रेकॉर्डमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास सुरू आहे. शर्मा मूळचा दिल्ली येथील साकेतचा रहिवासी आहे. त्याची दिल्लीच्या साउथ एक्स येथे जे-२३ मध्ये त्याची कन्सल्टन्सी फर्म आहे. आयएस, आयपीएस बदल्यांबरोबर जमिनीचे व्यवहार, शासकीय कामांमध्ये पैसे घेऊन तो काम करत होता. एखाद्या कामासाठी शर्माला पुढे केले जाई, अशी माहिती समोर आली आहे.
शर्माच्या दिल्लीतील राहत्या घरी, तसेच त्याच्या कन्सल्टन्सी फर्मचीही तपास पथके झडती घेतील. यातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे कारवाईस वेग येण्याची शक्यता गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना वर्तविली. दरम्यान, शर्मा, हिरमुखे यांच्या संपर्कात असलेल्या दिल्लीतील बड्या हस्तींचीही चौकशी सुरू आहे. त्यामुळे दिल्लीतून आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शर्मा याच्या मालमत्तेचाही गुन्हे शाखा आढावा घेत आहे.