‘पुढारी’च्या स्पष्टीकरणावर क्राइम ब्रँच असमाधानी
By Admin | Published: November 2, 2015 03:08 AM2015-11-02T03:08:24+5:302015-11-02T03:08:24+5:30
मटकाप्रकरणी दिलेल्या स्पष्टीकरणावर समाधान न झाल्याने ‘दैनिक पुढारी’च्या गोव्यातील निवासी संपादकांना रितसर समन्स बजावण्याचा निर्णय क्राइम ब्रँचने घेतला आहे
पणजी : मटकाप्रकरणी दिलेल्या स्पष्टीकरणावर समाधान न झाल्याने ‘दैनिक पुढारी’च्या गोव्यातील निवासी संपादकांना रितसर समन्स बजावण्याचा निर्णय क्राइम ब्रँचने घेतला आहे. ‘दैनिक पुढारी’ व ‘दैनिक तरुण भारत’ या वृत्तपत्रांसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर, पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे.
सीआरपीसी कलम ९१ अंतर्गत या दोन्ही दैनिकांना पत्रे पाठवून क्राइम ब्रँचने मटका प्रकरणात माहिती देण्यास सांगितले होते. तथापि, तांत्रिक कारण पुढे करून ‘दैनिक पुढारी’ने एकदा माहिती देण्याचे टाळले, परंतु पोलिसांच्या दुसऱ्या पत्राला त्यांना उत्तर द्यावेच लागले.
काही दिवसांपूर्वी या दैनिकाच्या निवासी संपादकांकडून क्राइम ब्रँचला पत्र लिहून स्पष्टीकरण देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, या पत्रात दिलेली माहिती आणि पोलिसांनी मागितलेली माहिती यात काहीच संबंध नसल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे सीआरपीसी कलम ४१ अंतर्गत दैनिक पुढारीच्या निवासी संपादकांच्या नावे समन्स बजावण्यात येणार असल्याची माहितीही या अधिकाऱ्याने दिली.
माहिती हक्क कार्यकर्ते काशिनाथ शेट्ये यांनी दाखल केलेली जनहीत याचिका गृहीत धरून मटका जुगारावर कारवाई न करणारे आणि प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे त्याला मदत करणाऱ्या सर्वांविरुद्धच गुन्हा दाखल करण्याचा आदेश खंडपीठाने दिला होता. आयपीसी कलम १०९, १२० (बी), (३४), गोवा दमण दीव जुगार विरोधी कायदा कलम ३, ४, ११ (२) १२ (१) (अ) अंतर्गत १२ आॅक्टोबरला हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.