क्राइम ब्रँचची ‘लोणकढी थाप’!

By Admin | Published: August 27, 2015 02:43 AM2015-08-27T02:43:21+5:302015-08-27T02:43:21+5:30

सुमारे आठ वर्षांपूर्वी मुंबईत रफी अहमद किडवई मार्गावरील नॅशनल मार्केटमध्ये एकाला अटक करायला गेलेल्या पोलीस पथकावर व्यापारी व इतरांच्या जमावाने हल्ला करून अटक

Crime Branch's 'Lonkadi Thap'! | क्राइम ब्रँचची ‘लोणकढी थाप’!

क्राइम ब्रँचची ‘लोणकढी थाप’!

googlenewsNext

मुंबई : सुमारे आठ वर्षांपूर्वी मुंबईत रफी अहमद किडवई मार्गावरील नॅशनल मार्केटमध्ये एकाला अटक करायला गेलेल्या पोलीस पथकावर व्यापारी व इतरांच्या जमावाने हल्ला करून अटक केलेल्या आरोपीला त्यांनी सोडवून नेले, ही गुन्हे शाखेने मारलेली ‘लोणकढी थाप’ उच्च न्यायालयाच्याही पचनी पडलेली नाही.
२४ आॅक्टोबर २००७ रोजी घडलेल्या या कथित घटनेवरून क्राइम ब्रँचच्या युनिट ४ ने सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद यासीन मोहम्मद इब्राहीम शेख यांच्यासह २२ जणांविरुद्ध बेकायदा जमाव जमविणे, दंगल करणे, पोलिसांच्या कामात व्यत्यय आणणे, दगडफेक करून जखमी करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे यासारख्या आरोपांवरून खटला दाखल केला होता. सत्र न्यायालयाने या सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले होते. त्याविरुद्ध अपिलाची परवानगी मागणारा अर्ज न्या. अभय ठिपसे यांनी फेटाळून लावला. विशेष म्हणजे आरोपींविरुद्ध कोणताही पुरावा नाही. मुळात पोलीस ज्याला अटक करायला म्हणून तेथे गेले होते, त्याच्याविरुद्ध कोणताही गुन्हा नोंदविलेला नव्हता. त्यामुळे पोलिसांनी केलेली कारवाईच पूर्णपणे बेकायदा होती. एवढेच नव्हे तर हा खटला म्हणजे पोलिसांनी स्वत:ची बेकायदा कृती दडपण्यासाठी अरेरावीने रचलेले कुभांड आहे, या सत्र न्यायालयाच्या निष्कर्षांवर न्या. ठिपसे यांनी शतप्रतिशत शिक्कामोर्तब केले.
नॅशनल मार्केटमधील भुल्लू या इसमाविरुद्ध किडवई मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीवरून आम्ही तेथे गेलो. भुल्लूला पकडून परतत असताना व्यापारी व इतरांचा दोन-तीन हजारांचा जमाव जमला. जमावाने पोलिसांचा रस्ता अडविला व दगडफेक केली. या दंगलसदृश वातावरणात पकडलेला भुल्लू आमच्या ताब्यातून सुटून पळाला, असे कथानक पोलिसांनी रचले होते. सत्र न्यायालयाच्या पाठोपाठ आता उच्च न्यायालयानेही ते असंभवनीय ठरवून अमान्य केले आहे. (विशेष प्रतिनिधी)

न्यायालयाने ओढलेले असूड..
भुल्लूविरुद्ध कोणत्याही दखलपात्र गुन्ह्याची नोंद नव्हती. त्यामुळे त्याला धरून आणण्यासाठी पोलिसांनी नॅशनल मार्केटमध्ये जाणेच मुळात बेकायदा होते. जमावाने दगडफेक केली व त्यात पोलीस वाहनांचे नुकसान झाले आणि काही पोलीस जखमी झाले यास कोणताही पुरावा नाही.
मोहम्मद इब्राहीम शेख हे त्या भागातील मान्यवर सामाजिक कार्यकर्ते आहेत. भुल्लू हा त्यांचा पुतण्या आहे. त्यामुळे पोलिसांनी भुल्लूला पकडल्यावर शेख यांनी मध्ये पडणे स्वाभाविक होते.
खरेतर किडवई मार्ग पोलीस ठाण्याचे माजी निरीक्षक विलास जोशी यांचा शेख यांच्यावर डोळा होता. त्यामुळे कदाचित जोशी यांनीच हे पोलीस पथक पाठविले असावे, या समजातून व्यापारी व इतरांनी गर्दी करणे म्हणजे बेकयदा जमाव जमविणे होत नाही. मुळात पोलिसांना बेकायदा कृत्याचा जाब विचारणे हा त्यांच्या कामात व्यत्यय ठरत नाही.

Web Title: Crime Branch's 'Lonkadi Thap'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.