इंद्राणी मुखर्जीसहीत अन्य कैद्यांनी भडकवलेलं दंगल प्रकरण आता गुन्हे शाखेकडे
By admin | Published: July 3, 2017 01:50 PM2017-07-03T13:50:09+5:302017-07-03T13:50:09+5:30
इंद्राणी मुखर्जीसहीत अन्य कैद्यांनी भायखळा जेलमध्ये घडवून आणलेले दंगल प्रकरण आता गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - भायखळा जेलमधील मंजुळा गोविंद शेट्ये या महिला कैद्याच्या मृत्यूनंतर झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी व अन्य 200 महिला कैद्यांविरोधात गुन्हा दाखल केला. आता हे प्रकरण मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले आहे. गुन्हेगारी कट रचणे, दंगल घडवणे या कलमांखाली इंद्राणी व अन्य 200 महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई गुन्हे शाखेचे प्रमुख संजय सक्सेना यांनी सांगितले की, गुन्हे शाखेनं नागपाडा पोलीस ठाण्यातून हे प्रकरण हाती घेतले आहे. पोलिसांनी या प्रकरणात असा दावा केला आहे की, मंजुळा गोविंद शेट्ये या महिला कैद्याच्या मृत्यूनंतर झालेल्या हिंसाचारामागे शीना बोरा हत्याप्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जीचा हात आहे. तिनंच अन्य कैद्यांना दंगल घडवण्यासाठी प्रवृत्त केले.
जेल अधिका-यांनी मंजुळा शेट्ये या महिला कैद्याला कथितस्वरुपात मारहाण केल्यानंतर 23 जूनच्या रात्री तिचा सरकारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचा निषेध करण्यासाठी अन्य महिला कैद्यांनी टेबल, खुर्चीं, स्वयंपाक घरातील सामानाची तोडफोड, तर कुठे छतावर चढून सुरू असलेल्या जाळपोळीसह प्रशासनाविरोधातील नारेबाजी केली. तर या सर्व कैद्यांना भडकवण्यामागे इंद्राणी मुखर्जीचा हात होता, असा दावा पोलिसांनी केला आहे.
दरम्यान, मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणी जेलमधील 6 कर्मचा-यांचं निलंबन करण्यात आले आहे. शिवाय, शनिवारी त्यांना अटकदेखील करण्यात आले होते.
कोण होती मंजुळा?
भांडुपमधील रहिवासी असलेली मंजुळा ही भांडुपच्या एका शाळेत शिक्षिका होती. १९९६ मध्ये तिने आई गोदावरीच्या मदतीने तिच्या भावजयीची जाळून हत्या केली.
या गुन्ह्यात दोघींनाही दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. दोघींचीही रवानगी पुण्याच्या येरवडा कारागृहात करण्यात आली होती. सहा महिन्यांपूर्वी तिच्या आईचा आजारपणामुळे कारागृहातच मृत्यू झाला. त्यामुळे तिने तेथे करमत नसून भायखळा कारागृहात बदली करून देण्याची मागणी केली.
गेल्या पाच महिन्यांपासून ती भायखळा कारागृहात आहे. शुक्रवारी रात्री तिचाही आजारपणामुळे मृत्यू झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.