जात पडताळणीच्या दोन कर्मचा-यांसह अमरावतीच्या नगरसेवकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
By admin | Published: December 4, 2015 02:38 AM2015-12-04T02:38:38+5:302015-12-04T02:38:38+5:30
अकोला सिटी कोतवाली पोलिसांनी अमरावती महापालिकेच्या नगरसेवकासह अकोल्याच्या विभागीय जात पडताळणी कार्यालयाच्या दोन कर्मचा-यांविरुद्ध गुन्हा दाखल.
अकोला: अमरावती महानगरपालिकेच्या एका नगरसेवकासह अकोल्याच्या विभागीय जात पडताळणी समिती कार्यालयाच्या दोन कर्मचार्यांविरुद्ध गुरुवारी सिटी कोतवाली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या दोन कर्मचार्यांमध्ये एक महिला कर्मचारी असून, त्यांनी बनावट दस्तऐवजाच्या आधारे या नगरसेवकास लोहार जातीचे पडताळणी प्रमाणपत्र बनवून दिल्याचे वृत्त आहे. अमरावती येथील गवळीपुरामधील रहिवासी तथा नगरसेवक शेख हमीद शेख हनिफ याने अकोल्याच्या विभागीय जात पडताळणी समिती कार्यालयातील कर्मचारी सुनंदा मानकर आणि अब्दुल रऊफ पांडे या दोघांच्या मदतीने बोगस दस्तऐवजाद्वारे ३१ मे ते ३0 जून २0१४ या कालावधीत जात पडताळणी प्रमाणपत्राचा प्रस्ताव तयार करून तो अकोला कार्यालयात सादर केला. या प्रस्तावावर अमरावती येथीलच कोहिनूर कॉलनी येथील रहिवासी सलिम बेग युसूफ बेग यांनी आक्षेप घेत अकोला जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीवरून जिल्हाधिकार्यांनी या प्रकरणाची चौकशी उपविभागीय अधिकार्यांकडे सोपवली. उपविभागीय अधिकार्यांनी या प्रकरणाची चौकशी केली असता, त्यामध्ये नगरसेवक शेख हमीद शेख हनिफ यांच्या जात पडताळणी प्रस्तावात जोडण्यात आलेली कोतवाल बुकाची नक्कल बोगस असल्याचे आढळून आले. यासोबतच प्रस्तावातील अनेक दस्तऐवज सदोष असल्याचेही या चौकशीत निष्पन्न झाले. त्यामुळे या प्रकरणी महसूल कर्मचारी कैलास नामदेव शेगोकार यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सिटी कोतवाली पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर, नगरसेवक शेख हमीद शेख हनिफ याने जात पडताळणी कार्यालयातील कर्मचारी सुनंदा मानकर व अब्दुल रऊफ पांडे या दोघांच्या मदतीने लोहार जातीचे जात पडताळणी प्रमाणपत्र काढल्याचे समोर आले. या तिघांनी शासकीय यंत्रणेची फसवणूक केल्याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी या तिघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४२0, ४६८, ४७१ व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.