गुन्हेगाराला कोणताही राजकीय रंग नसतो
By admin | Published: February 28, 2016 01:51 AM2016-02-28T01:51:10+5:302016-02-28T01:51:10+5:30
गुन्हेगार राजकारणात शिरून राजकीय वलय मिळवित असले तरी राजकारणातील एखादी व्यक्ती जेव्हा गुन्हा करते तेव्हा ती अमूक एका राजकीय पक्षाची म्हणून गुन्हेगार असत नाही,
पुणे : गुन्हेगार राजकारणात शिरून राजकीय वलय मिळवित असले तरी राजकारणातील एखादी व्यक्ती जेव्हा गुन्हा करते तेव्हा ती अमूक एका राजकीय पक्षाची म्हणून गुन्हेगार असत नाही, असा काहीसा अचंबित करणारा पवित्रा राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी शनिवारी येथे घेतला.
पुणे ग्रामीण पोलिसांच्या पोलीस मित्र मेळाव्यात दीक्षित उपस्थित होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना मारहाण होण्याच्या लातूर आणि ठाणे येथील अलिकडच्या घटनांबद्दल विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी अत्यंत सावध पवित्रा घेत उत्तर दिले. गुन्हेगार राजकीय पक्षांचे वलय मिळवत असले तरी गुन्हेगार आणि राजकीय पक्षांचा तसा संबंध नसतो. महिला पोलिसाला मारहाण झाल्याच्या प्रकणात आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. गुन्हेगारी पार्श्वभुमीचे लोक राजकीय पक्षांमध्ये जातात. राजकीय पक्ष आणि गुन्हेगारांचा संबंध जोडणे चुकीचे आहे. ठाण्यातील घटनेतील आरोपीच्या संदर्भात संबंधित पक्षाने तो आमचा कार्यकर्ता नसल्याचे स्पष्ट केले आहे, असे दीक्षित यांनी सांगितेले. (प्रतिनिधी)
पोलीसमित्रांंनाही प्रशिक्षण
राज्यामध्ये राबवण्यात येणारी पोलीस मित्र संकल्पना सद्विचारांवर आधारलेली आहे. ती यशस्वी होत असून अशाप्रकारे नागरी सहभागातून पोलिसांकडून राबवला जाणारा देशातील हा पहिला उपक्रम आहे. यापुढे पोलीसमित्रांनाही पोलिसांप्रमाणे प्रशिक्षण द्यावे, जेणेकरुन त्यांच्या कामात कुशलात येईल, अशी सूचना पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी केली. पुणे ग्रामीण पोलिसांनी आयोजित केलेल्या पोलीस मित्र मेळाव्यामध्ये महासंचालकांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीसमित्रांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, अधिक्षक डॉ. जय जाधव, अतिरीक्त अधिक्षक राजकुमार शिंदे, तानाजी चिखले यावेळी उपस्थित होते.
दीक्षित म्हणाले, इस्रायल आणि अमेरिकेमध्ये पोलीसमित्र संकल्पना विविध पद्धतीने राबवण्यात येते. आपल्या देशात मात्र केवळ महाराष्ट्रातच पोलिसांच्या कामात नागरी सहभाग घेतला जातो. उपक्रमाला मिळत असलेला उत्तम प्रतिसाद पाहता आपले काम योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. पोलीसमित्रांची संख्या आणखी वाढवून त्यांना पोलिसांप्रमाणे प्रशिक्षण द्यावे. शासन स्तरावर अद्याप मान्यता मिळालेली नसली तरी राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यापर्यंत ही संकल्पना पोहोचल्याचे दीक्षित म्हणाले.