गुन्हेगारी १५ टक्क्यांनी वाढली
By admin | Published: June 6, 2014 12:50 AM2014-06-06T00:50:59+5:302014-06-06T00:50:59+5:30
विदर्भातील गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारीत १५.५१ टक्के वाढ झाली आहे. नागपूर शहरानंतर यवतमाळ आणि अमरावती ग्रामीणमध्ये सर्वाधिक गुन्हेगारी असून गडचिरोली आणि गोंदिया
सीआयडीचा अहवाल : नक्षलग्रस्त भागात अत्यल्प गुन्हेगारी
राहुल अवसरे - नागपूर
विदर्भातील गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारीत १५.५१ टक्के वाढ झाली आहे. नागपूर शहरानंतर यवतमाळ आणि अमरावती ग्रामीणमध्ये सर्वाधिक गुन्हेगारी असून गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलप्रभावित जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण अत्यल्प आहे. गंभीर गुन्ह्यांपैकी केवळ बलात्काराच्या घटनांमध्ये ३0 टक्के वाढ झालेली आहे. ही धक्कादायक माहिती राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आली आहे. या अहवालानुसार २0१२ मध्ये गंभीर आणि किरकोळ स्वरूपाच्या १ लाख १७ हजार १९९ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. २0१३ मध्ये ही नोंद १ लाख २0 हजार ५६८ एवढी असून एकूणच गुन्हेगारीत केवळ २.७९ टक्के वाढ झालेली आहे. मात्र खून, बलात्कार, दरोडा, दंगल, लुटमार, चोरी आदी गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारीत १५.५१ टक्के वाढ झाली आहे. २0१२ मध्ये ३८ हजार ५१७ गंभीर स्वरूपांच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती. तर २0१३ मध्ये ४५ हजार ८२६ एवढी नोंद करण्यात आली.
गुन्हेगारीत यवतमाळचे स्थान दुसरे
गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा घेण्यात आलेला आढावा असा, कंसातील आकडेवारी २0१२ ची आहे. नागपूर शहरात ८३६८ (७0७४) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. विदर्भातील एकूण गुन्ह्यांमध्ये ही टक्केवारी १८.२६ एवढी आहे. त्याखालोखाल यवतमाळचा क्रमांक लागतो. या ठिकाणी ७१३६ (४५४२) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून टक्केवारी १५.५७ एवढी आहे. अमरावती ग्रामीणचे स्थान तिसरे आहे. येथे ५७८१ (३५२0) गुन्ह्यांची नोंद असून ही टक्केवारी १२.६१ एवढी आहे. गुन्हेगारीत चंद्रपूरचा चवथा क्रमांक असून ३६८९ (३३0९) एवढय़ा गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. ही टक्केवारी आठ एवढी आहे. गुन्हेगारीत नागपूर ग्रामीणचे स्थान पाचवे आहे. ३५३५ (३२0८) एवढय़ा गुन्ह्यांची नोंद असून ही टक्केवारी ७.७१ आहे. अकोल्याचे स्थान सहावे असून ३४९३ (२९६४) एवढय़ा गुन्ह्यांची नोंद आहे. ही टक्केवारी ७.६२ आहे. बुलडाणा जिल्हा सातव्या स्थानावर असून ३४२0 (२८७१) एवढय़ा गुन्ह्यांची नोंद आहे. ही टक्केवारी ७.४६ आहे.
वाढत आहेत बलात्कार
नवी दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर कायदा कठोर होऊनही बलात्कार या जघन्य अपराधाचे प्रमाण वाढत आहे. विदर्भात या गुन्ह्यात २९.६0 टक्के वाढ झाली आहे. सर्वाधिक घटना यवतमाळ जिल्ह्यात घडल्या आहेत.
गतवर्षी २0१३ मध्ये बलात्काराच्या ७४३ घटना घडल्या. २0१२ मध्ये ५२३ घटना घडल्या होत्या. २२0 घटनांमध्ये वाढ झाली आहे. सर्वाधिक १0४ घटना यवतमाळ जिल्ह्यात घडलेल्या आहेत. त्याखालोखाल नागपूर शहरात ८२, चंद्रपूर जिल्ह्यात ८१, वर्धा जिल्ह्यात ७३, नागपूर ग्रामीणमध्ये ७0, अमरावती ग्रामीणमध्ये ६७, बुलडाणा जिल्ह्यात ५४, गोंदिया जिल्ह्यात ५१, अकोला जिल्ह्यात ४0, भंडारा जिल्ह्यात ३९, गडचिरोली जिल्ह्यात ३२, वाशिम जिल्ह्यात २६ आणि अमरावती शहरात २४ घटना घडल्या आहेत.
२0१२ मध्ये बलात्काराच्या सर्वाधिक ६२ घटना अमरावती ग्रामीणमध्ये घडल्या होत्या. त्याखालोखाल यवतमाळ जिल्ह्यात ६१, नागपूर शहरात ५७, वर्धा जिल्ह्यात ४८, चंद्रपूर जिल्ह्यात ४६, गोंदिया जिल्ह्यात ४३, वाशिम जिल्ह्यात ३६, बुलडाणा जिल्ह्यात ३४, नागपूर ग्रामीणमध्ये ३१, भंडारा जिल्ह्यात २९, अमरावती शहरात २२, अकोला आणि गडचिरोली जिल्ह्यात प्रत्येकी १९ घटना घडल्या होत्या.
खुनाच्या घटनांमध्ये ४ टक्के वाढ
२0१३ मध्ये खुनाच्या ५९८ घटना घडल्या असून २0१२ मध्ये ५७0 घटना घडल्या होत्या. ही वाढ ४.६१ टक्के आहे.
खुनाच्या सर्वाधिक १0३ (८८) घटना नागपुरात, ८५ (७0) घटना यवतमाळात, ५१ (६३) अमरावती ग्रामीण, ४७ (४६) बुलडाणा, ४५ (५५) नागपूर ग्रामीण, ४५ (३0) वर्धा, ३९ (५७) गडचिरोली, ३५ (४४) चंद्रपूर, ३४ (४२) अकोला, ३१ (४१) गोंदिया, २९ (२0) भंडारा, २४ (३९) वाशिम आणि १७ (२४) खुनाच्या घटना अमरावती शहरात घडल्या आहेत.
जबरीचोरी आणि मंगळसूत्र पळविण्याच्या घटनांमध्येही ७.७९ टक्के वाढ झालेली आहे. २0१३ मध्ये १0६६ तर २0१२ मध्ये ९८४ एवढय़ा घटना घडल्या होत्या.
एकूण गुन्हेगारीत वर्धा तिसरे
किरकोळ आणि गंभीर स्वरूपाच्या एकूण गुन्हेगारीत वर्धा जिल्ह्याचे स्थान तिसरे आहे. मात्र गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारीत हे स्थान आठवे आहे. या ठिकाणी ३३५३ (२९३२) एवढय़ा गुन्ह्यांची नोंद असून टक्केवारी ७.३१ एवढी आहे.
राज्याच्या एकूण गुन्हेगारीत लोकसंख्येच्या मानाने अमरावती शहराचा पहिला क्रमांक लागतो. मात्र विदर्भातील एकूण गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारीत हे शहर नवव्या क्रमांकावर आहे. या ठिकाणी २३0८ (२३६७) गुन्ह्यांची नोंद असून ही टक्केवारी पाच एवढी आहे. वाशिम दहाव्या स्थानावर आहे. २0६१ (१८0६) एवढय़ा गुन्ह्यांची नोंद असून ही टक्केवारी ४.४९ एवढी आहे. गुन्हेगारीत भंडारा जिल्हा अकराव्या स्थानावर आहे. १९८१ (१७९९) एवढी गुन्ह्यांची नोंद असून टक्केवारी ४.३२ एवढी आहे.