गुन्हे, आरोपींची माहिती आॅनलाइन

By admin | Published: October 26, 2015 02:20 AM2015-10-26T02:20:34+5:302015-10-26T02:20:34+5:30

नागरिकांना आता आपल्या जिल्ह्यासह राज्यात विविध प्रकारचे दाखल गुन्हे व अटक आरोपी, हरवलेल्या व्यक्ती, बेवारस मृत्यू आदी माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

Crime, Information of the accused online | गुन्हे, आरोपींची माहिती आॅनलाइन

गुन्हे, आरोपींची माहिती आॅनलाइन

Next

जमीर काझी, मुंबई
नागरिकांना आता आपल्या जिल्ह्यासह राज्यात विविध प्रकारचे दाखल गुन्हे व अटक आरोपी, हरवलेल्या व्यक्ती, बेवारस मृत्यू आदी माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालये व अधीक्षक कार्यालयातर्फे वेबसाइटवर ही माहिती दिली जाणार आहे. त्यासाठी त्यांना १० नोव्हेंबरची ‘डेडलाइन’ देण्यात आली आहे.
राज्य पोलीस दलातील एकूण विविध ५२ घटकांपैकी १४ घटकांचे संकेतस्थळ आजपर्यंत बनविण्यातच आलेले नव्हते. आता पोलीस खात्याचा कारभार पारदर्शी व अद्ययावत राहावा, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
राज्यातील ११ कोटींवर जनतेच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या पोलिसांचा बहुतांश वेळ बंदोबस्त व तपास कामात व्यतित होत असतो. त्यामुळे अनेकवेळा आवश्यक माहिती नागरिकांना मिळत नाही. अधिकारी, कर्मचारी बंदोबस्त व अन्य ड्युटीमध्ये व्यस्त असल्याने ते सर्वसामान्य नागरिकांना भेटीसाठी उपलब्धही होत नाहीत.
जनतेला पोलीस दलातील अद्ययावत माहिती सहज उपलब्ध व्हावी, त्याचप्रमाणे त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सहज संपर्क साधता यावा, यासाठी प्रत्येक आयुक्तालय व अधीक्षक कार्यालयाची वेबसाईट अत्यावश्यक असल्याचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी सर्व अधिकाऱ्यांना बजावले आहे. याबाबत तत्काळ पूर्ततेचे आदेश त्यांनी दिले आहेत. वेबसाईटवर प्रेस रिलीज, हरविलेल्या व्यक्ती, बेवारस मृतदेह, दाखल गुन्हे व पकडलेल्या आरोपींची माहिती, त्याचप्रमाणे स्थानिक स्तरावर केल्या जाणाऱ्या ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह’च्या कारवाईची माहिती दररोज बेवद्वारे उपलब्ध करून द्यावयाची आहे.
आयुक्त / अधीक्षकांनी या कामाची पूर्तता करून घेण्यासाठी राज्य व केंद्र सरकार आणि ‘डीआयटी’ने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. त्यासाठी आवश्यक बाबींसाठी पोलीस मुख्यालयातील संगणक कक्ष अधिकाऱ्यांकडून मदत घेण्याची सूचना करण्यात आली आहे.

Web Title: Crime, Information of the accused online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.