‘क्राइम पेट्रोल’ पाहून रचला अपहरणाचा कट
By Admin | Published: October 3, 2016 02:59 AM2016-10-03T02:59:55+5:302016-10-03T02:59:55+5:30
लहान मुलाचे अपहरण करण्यासाठी चालकावर चाकूने हल्ला करून टॅक्सी चोरणाऱ्या तिघांना नेरूळ पोलिसांनी अटक केली आहे
नवी मुंबई : एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या लहान मुलाचे अपहरण करण्यासाठी चालकावर चाकूने हल्ला करून टॅक्सी चोरणाऱ्या तिघांना नेरूळ पोलिसांनी अटक केली आहे. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून त्यांना ‘क्राइम पेट्रोल’ मालिकेतून ही शक्कल सुचली होती. त्यानुसार चोरीच्या टॅक्सीतून नेरूळमधीलच एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या लहान मुलाचे अपहरण करून खंडणी उकळण्याचा त्यांनी कट रचला होता. परंतु अपहरणाच्या प्रयत्नात असतानाच नेरूळ पोलिसांनी शिताफीने त्यांना अटक केली.
पामबीच मार्गावर मंजुर खान या टॅक्सी चालकावर चाकूने हल्ला करून लुटल्याची घटना २१ सप्टेंबर रोजी घडली होती. मानखुर्द येथून प्रवासी भाडे घेवून आल्यानंतर परत मुंबईच्या दिशेने जाताना एलपी पुलापासून दोघे जण त्यांच्या टॅक्सीत बसले होते. त्यांनी एक साथीदार सानपाडा येथे असल्याचे सांगून त्याठिकाणी इतर एकाला टॅक्सीत घेतले. त्यानंतर एक वस्तू नेरुळमध्येच विसरल्याचे सांगून पामबीच मार्गे टॅक्सी नेरुळच्या दिशेने घेवून आले. परंतु पामबीच मार्गावर तलावालगत टॅक्सी थांबवून खान यांच्यावर चाकूने हल्ला करून झाडीमध्ये फेकून त्यांची टॅक्सी (एमएच ०१ एटी ४५५८) चोरली होती. याप्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या तपासाकरिता उपआयुक्त प्रशांत खैरे, सहाय्यक आयुक्त धनराज दायमा, वरिष्ठ निरीक्षक अधिकराव पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे उपनिरीक्षक चव्हाण, पोलीस निरीक्षक भागुजी औटी, सहाय्यक निरीक्षक सुशीलकुमार गायकवाड, राजेश गज्जल यांच्या पथकाने तपास सुरू केलेला.
यादरम्यान पोलिसांना संशयितांची व चोरीच्या टॅक्सीची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून तिघांनाही नेरुळमधून अटक करण्यात आली. त्यांच्यापैकी एक अल्पवयीन (१७ वर्षांचा) असून ललित रामचंद्र ठाकूर (२१), सूरज शंकर पाटील (२२) अशी इतर दोघांची नावे आहेत. तिघेही नेरुळचे राहणारे असून गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. शिवाय ते नेहमी ‘क्राइम पेट्रोल’ ही गुन्हेविषयक मालिका पहायचे. यातूनच अपहरणाची कल्पना सुचल्याची कबुली त्यांनी दिल्याचे उपआयुक्त प्रशांत खैरे यांनी सांगितले. यापूर्वी त्यांनी काही ट्रक चालकांना लुटले असून एकदाच मोठी रक्कम कमवण्याच्या उद्देशाने त्यांनी अपहरणाचा कट रचला होता. याकरिता काही दिवस नेरुळच्या वंडर्स पार्कमध्ये सकाळच्या वेळी पाळत ठेवल्यानंतर एक प्रतिष्ठित व्यक्ती व एका प्रतिष्ठित व्यक्तीचा लहान मुलगा अशा दोघांच्या अपहरणाचा कट रचला होता. त्याकरिता चोरलेली टॅक्सी घेवून ते वंडर्स पार्कलगत पाळत ठेवून होते. परंतु ठरवलेल्या दोघांच्या अपहरणाची संधी त्यांना मिळत नव्हती. याचदरम्यान नेरुळ पोलिसांना त्यांची माहिती मिळताच सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली. तर वेळीच त्यांच्या अटकेमुळे संभाव्य दोघांचे अपहरण टळल्याचे उपआयुक्त खैरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)