सातवीच्या विदयार्थ्यावर विनयभंगाचा गुन्हा
By admin | Published: September 16, 2016 11:58 PM2016-09-16T23:58:31+5:302016-09-16T23:58:31+5:30
वर्गातील मुलीला सलग दोन वर्षांपासून त्रास देणा-या आणि आता अधिकच निर्ढावलेल्या सातवीच्या एका विद्यार्थ्यावर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १६ : वर्गातील मुलीला सलग दोन वर्षांपासून त्रास देणा-या आणि आता अधिकच निर्ढावलेल्या सातवीच्या एका विद्यार्थ्यावर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पालकांसह पोलिसांनाही अचंबित करणारा हा प्रकार अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला.
या प्रकरणातील पिडीत मुलीने नोंदविलेल्या तक्रारीनुसार आणि पोलिसांनी विनयभंगासह अनेक गंभीर आरोपावरून गुन्हा दाखल केलेल्या मुलाचे वय अवघे १२ वर्षे आहे. तो सातव्या वर्गात शिकतो. दोन वर्षांपूर्वी तो पाचवीत होता. अजनीतील एका शाळेत शिकणा-या या मुलाच्या बाजूच्या बेंचवर एक मुलगी बसायची. क्षुल्लक कारणावरून तो तिला चिडवायचा. मुलगी गरिब कुटुंबातील असून, वडील आजारी असल्यामुळे ती नातेवाईकांकडे आश्रयाला आहे. कधी टोमणे मारायचा, कधी पेन, पेन्सिल तर कधी कंपॉस फेकून मारायचा.
मुलगी दोन वर्षांपासून निमुटपणे त्याचा त्रास सहन करीत होती. आता ती अन् तो बारा वर्षांचा झाला. दोघेही सातवीत शिकतात. मुलगी प्रतिकार करत नसल्याचे पाहून तो चांगलाच निर्ढावला. मुलीची वेणी ओढणे, तिच्या अंगावरून नको त्या ठिकाणाहून हात फिरवणे, अश्लिल शिवीगाळ करणे अन् विरोध केल्यास धमकी देण्यापर्यंत त्याची हिम्मत वाढली. त्याचा त्रास कमी होण्याऐवजी सारखा वाढतच राहिला. ७ सप्टेंबरला दुपारी १.३० वाजता त्याने पीडित मुलीला अश्लिल शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच मारण्याची धमकीही दिली.
त्रास असह्य झाल्यामुळे पीडित मुलीने आपल्या पालकांकडे तक्रार केली. पालकांनी अजनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. ठाणेदार संदिपान पवार यांनी प्रकरणाची शहानिशा करून घेतली. त्यानंतर पीडित मुलीच्या पालकांची तक्रार नोंदवून घेत शुक्रवारी ह्यत्याह्य मुलाविरुद्ध भादंविच्या कलम ३५४ (विनयभंग) ५०९, ३२३ (मारहाण करणे), ५०६ (धमकी देणे) तसेच बाल लैंगिक अपराध प्रतिबंधक अधिनिअम २०१२ च्या सहकलम ८, १२ अन्वये गुन्हा दाखल केला.
सर्वत्र खळबळ
या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांनी प्रकरणाची संवेदनशिलता लक्षात घेत गुन्हा दाखल केला. मात्र, गणेश विसर्जनाच्या बंदोबस्तात पोलीस दल व्यस्त असल्याने गुन्हा दाखल केलेल्या मुलाला ताब्यात घेतले नाही. शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी सकाळी त्याला तब्यात घेऊन त्याची सुधारगृहात रवानगी केली जाईल, असे अजनी पोलिसांनी लोकमतला सांगितले.