भाजपा आमदार नरेंद्र मेहतांवर खंडणीचा गुन्हा
By admin | Published: January 28, 2017 02:42 AM2017-01-28T02:42:11+5:302017-01-28T02:42:11+5:30
एका विकासकाकडे दोन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर
मीरा रोड : एका विकासकाकडे दोन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मीरा रोडच्या नयानगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. यात पालिकेचे ५ अधिकारीदेखील आरोपी आहेत. भागीदारी व खंडणीला नकार देत याबाबतची तक्रार पोलिसांकडे केल्याने मेहता यांनी दबाव टाकून पालिकेमार्फत विकासकाच्या बांधकामावर कारवाई करायला लावली. लाच प्रकरणातून पुराव्याअभावी सुटका झालेले मेहता पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
मीरा रोडच्या शांतीनगरमध्ये राहणारे विनोद त्रिवेदी यांची बालाजी बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स नावाची कंपनी आहे. मीरा रोडच्या ब्रह्मदेव मंदिराजवळचा भूखंड २००७ मध्ये खरेदी केला होता. मे २०१५ मध्ये त्यांनी या ठिकाणी इमारत बांधकामासाठी पालिकेकडे परवानगी मागितली असता जूनमध्ये सर्व सोपस्कार उरकून पालिकेने बांधकाम परवानगी दिली. जागेवर आधी असलेल्या जोत्याचा दंडदेखील पालिकेने घेतला. जोत्याचा दाखला मिळण्यासाठी त्यांनी आॅगस्टमध्ये अर्ज केला. परंतु, दाखला दिला जात नसल्याने विचारणा केल्यावर नगररचनाकार दिलीप
घेवारे यांनी आमदार मेहता यांची हरकत असून त्यांना भेटून घ्या, असे सांगितले.
विकास नियंत्रण नियमावलीनुसार अर्ज केल्यापासून १५ दिवसांच्या आत पालिकेने जोत्याचा दाखला दिला पाहिजे. त्रिवेदी यांनी आपले बांधकाम सुरू केले. ५२ दिवस झाले व स्मरणपत्र देऊनही पालिकेने काहीच केले नाही.
त्रिवेदी हे मेहतांना भेटण्यास जात नसतानाच दुसरीकडे १५ सप्टेंबरला घेवारे यांनी दाखला घेतल्याशिवाय बांधकाम करू नये, अशी नोटीस त्रिवेदी यांना बजावली. त्रिवेदी यांनी आपले काम थांबवले. घेवारे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी पुन्हा मेहतांना भेटा, त्याशिवाय काहीही होणार नाही, असे स्पष्ट केले. अखेर, त्रिवेदी यांनी मेहतांना फोन केला असता बंगल्यावर बोलावले. पण, तासभर बंगल्याबाहेर थांबूनही मेहता यांची भेट झाली नाही.
काही दिवसांनी त्रिवेदी यांची मेहतांच्या बंगल्यावर भेट झाली. चार मजल्यांची परवानगी असताना मेहतांनी ७ मजले बांध व मला भागीदारीत घे, अन्यथा २ कोटी रुपये दे, अशी मागणी केली. त्यास त्रिवेदी यांनी नकार दिल्याने मेहतांनी ‘बघतोच तू बिल्डिंग कशी बांधतो’ असा दम देत गंभीर परिणाम होतील, अशी धमकीही दिली. दरम्यान, प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत, संजय दोंदे, अतिक्रमणविरोधी विभागप्रमुख चंद्रकांत बोरसे, कनिष्ठ अभियंता भूपेश काकडे हे सातत्याने त्रिवेदी यांच्या साइटवर कारवाईसाठी जाऊ लागले.
१७ नोव्हेंबर २०१५ रोजी मेहतांनी त्यांच्या फोनवरूनच त्रिवेदी यांना २ कोटी दिले नाही, मग काम कसे केले म्हणून विचारणा केली. याबाबत, त्रिवेदी यांनी नयानगर पोलीस ठाणे गाठून मेहता विरुद्ध फिर्याद द्यायची, असे सांगितले. परंतु, तत्कालीन सहायक निरीक्षक प्रवीण साळुंके यांनी गुन्हा दाखल करून न घेता केवळ तक्रार अर्जच घेतला. त्यानंतर, मात्र २६,२७ व २९ असे सतत तीन दिवस पालिकेचा फौजफाटा कारवाईसाठी गेला. २९ ला त्रिवेदी यांचे बांधकाम पाडले. शिवाय, त्यांच्यावर एमआरटीपी व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अखेर, त्रिवेदी यांनी याप्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. २३ जानेवारीला न्यायालयाने मेहतांसह सर्व संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने नयानगर पोलिसांनी त्रिवेदी यांच्या फिर्यादीनुसार मेहता यांच्यासह घेवारे, दोंदे, सावंत, बोरसे व काकडे यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)