पुण्यातील भाजपा आमदार योगेश टिळेकरांवर खंडणीचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 09:15 PM2018-10-12T21:15:56+5:302018-10-12T21:22:28+5:30
५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे आमदार योगेश टिळेकर, त्यांचा भाऊ चेतन टिळेकर आणि गणेश कामठे यांच्याविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : आॅप्टीकल फायबरचे कामे करणा-या व्यवसायिकाला धमकावून व कंपनीच्या कर्मचाºयांना त्रास देऊन देऊन ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे आमदार योगेश टिळेकर, त्यांचा भाऊ चेतन टिळेकर आणि गणेश कामठे (सर्व रा. कोंढवा बुद्रुक, ता. हवेली) यांच्याविरूध्द कोंढवा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी रविंद्र लक्ष्मण बऱ्हाटे (वय ५५, रा. सरगम सोसायटी, धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बऱ्हाटे एरंडवणे भागातील इ-व्हिजन टेली इन्फ्रा प्रा. लि. कंपनीत व्यवस्थापक आहेत. या कंपनीकडून विविध माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांना सेवा पुरविले जाते. कात्रज-कोंढवा रोड या भागात केबलचे काम चालू होते. या तिघांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना काम थांबविण्यास सांगितले. कामठे यांनी वारंवार फोन करून व समक्ष भेटून त्यांच्या मतदार संघात काम करण्यासाठी पैशाची मागणी केली. कंपनीच्या केबल चोरणे, धमकावणे असे प्रकारही याकाळात घडले. रविवारी ७ सप्टेंबर रोजी काम सुरू ठेवायचे असेल तर पन्नास लाख रुपये द्याावे लागतील, अधी धमकी देण्यात आली होती, असे बऱ्हाटे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर धमकी देण्याचे प्रकार सुरू होते. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार खंडणी मागणे, धमकावणे या कलमांन्वये टिळेकर यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टिळेकर हे भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षही आहे. यापूवीर्ही त्यांच्यावर विकास आराखड्यातील आरक्षण बदलून बांधकाम व्यावसायिकाचा फायदा करून देण्यासाठी १ कोटी रुपयांची मर्सिडिझ गाडी लाच स्वरुपात स्वीकारल्याचा आरोप झाला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते वसंत मोरे यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.
...............
भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या विरोधात तक्रार आली होती. त्यानुसार चौकशी करण्यात आली होती. त्यामध्ये त्यांनी पैसे मागणे आणि कामात अडथळे आणल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावरून त्यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील चौकशी सुरू आहे.
शिवाजी बोडके, सहपोलीस आयुक्त