भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह २८ जणांवर पुण्यात खंडणीचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2021 01:20 PM2021-01-05T13:20:00+5:302021-01-05T13:31:24+5:30

अपहरण करुन खंडणी उकळल्याप्रकरणी गिरीश महाजनांसह २८ जणांवर गुन्हा दाखल..

Crime registred against BJP leader Girish Mahajan and 28 others in Pune | भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह २८ जणांवर पुण्यात खंडणीचा गुन्हा दाखल

भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह २८ जणांवर पुण्यात खंडणीचा गुन्हा दाखल

Next

पुणे : जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संस्थेच्या संचालकाचे अपहरण करुन गळ्याला चाकू लावून राजीनामे देण्यासाठी दबाव टाकून ५ लाखांच्या खंडणी उकळल्याप्रकरणी माजी मंत्री गिरीश महाजनांसह २८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी अ‍ॅड. विजय भास्करराव पाटील (वय ५३, रा. दीक्षितवाडी, जळगाव) यांनी जळगाव जिल्ह्यातील निभोरा पोलीस ठाण्यात ९ डिसेंबर रोजी फिर्याद दिली होती. हा प्रकार जानेवारी २०१८ मध्ये कोथरुडमधील हॉटेल किमया येथे घडल्याने तेथून हा गुन्हा कोथरुड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. 

माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह तानाजी केशव भोईटे, निलेश रणजित भोईटे, वीरेंद्र रमेश भोईटे, अलका संतोष पवार, सुषमा इंगळे यांच्यासह २८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण....  

जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित यासंस्थेच्या गैरकारभारामुळे शासनाने त्यावर २०१२मध्ये प्रशासक नेमले होते. त्यानंतर २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत नरेंद्र पाटील, विजय पाटील व इतर १८ जण निवडून आले होते. तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांच्या पाठीराख्यांचा पराभव झाला होता. जानेवारी २०१८ मध्ये फिर्यादी पाटील यांना निलेश भोईटे यांचा फोन आला व त्यांनी संस्थेची जुनी कागदपत्रे देण्यासाठी पुण्यात बोलावले. तानाजी भोईटे यांना जळगावला येण्यास मनाई असल्याने पाटील यांना पुण्याला बोलावण्यात आले. हॉटेल किमया येथे तानाजी भोईटे यांनी ही संस्था गिरीशभाऊला हवी आहे़ आमच्या ताब्यात संस्था देऊन टाका. भाऊ एक कोटी देण्यास तयार आहे, असे सांगितले पाटील व महेश पाटील यांनी त्यास नकार दिल्यावर निलेश भोईटे यांनी गिरीश महाजन यांना व्हॉटसअ‍ॅप कॉल लावला. महाजन यांनी तू सर्व संचालकांचे राजीनामे घेऊन संस्था निलेशच्या ताब्यात देऊन विषय संपवून टाक, असे सांगितले. त्याला पाटील यांनी नकार दिला. त्यानंतर त्यांना संस्थेचे रेकॉर्ड देण्यासाठी सदाशिव पेठेत घेऊन गेले. तेथे त्यांचे हात पाय बांधून मारहाण केली. गळ्याला चाकून लावून त्यांचे कपडे काढून डांबुन ठेवले. सर्व संचालकाचे राजीनामे नाही आणले तर एमपीडीए च्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. 

राजीनामे देण्यास नकार दिल्याने खंडणी स्वरुपात ५ लाख रुपये घेऊन संस्थेत कुर्‍हाडीसह प्रवेश करुन तोडफोड करुन संस्थेच्या कर्मचार्‍याच्या खिशातील ५ हजार रुपये व दोन तोळ्याची चैन तोडून घेऊन गेले. आरोपींनी फिर्यादी व इरातंना संस्थेत जाण्यापासून मज्जाव केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र चव्हाण यांच्याकडे देण्यात आला आहे.

Web Title: Crime registred against BJP leader Girish Mahajan and 28 others in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.