जेसीबी बकेटने ''त्या'' बैलाला अमानुषपणे जीवे मारल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 06:36 PM2019-11-19T18:36:52+5:302019-11-19T18:52:45+5:30

दिवाळीत ऐन लक्ष्मीपुजनादिवशी अमानुषपणे बैलाचा घेतला जीव  

crime registred against two person due to ox killed by JCB Bucket | जेसीबी बकेटने ''त्या'' बैलाला अमानुषपणे जीवे मारल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

जेसीबी बकेटने ''त्या'' बैलाला अमानुषपणे जीवे मारल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्दे... या भीतीने बैलाला जीवे मारण्यात आलेअमानुषपणे मारलेल्या बैलाचा एकुण २ मिनिटे ४१ सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

भिगवण : पिसाळलेल्या बैलाला जेसीबी बकेट ने दाबुन अमानुषपणे जीवे मारल्याप्रक़रणी भिगवणपोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. जेसीबीच्या सहाय्याने मारलेल्या बैलाचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर  व्हायरल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासुन या बैलाला मारण्यासाठी झालेला अमानुषपणा तीव्र संताप व्यक्त होत आहे.मात्र, त्या गावाची माहिती मिळाली नव्हती.अखेर त्या गावाची,आरोपीची माहिती आता पुढे आली आहे.ती घटना इंदापुर तालुक्यातील पोंदवडी येथे घडली आहे.
     पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,याप्रकरणी भिगवण पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल निलेश शिंदे यांनी फिर्याद दिली  आहे. त्यानुसार  आरोपी गोटया ऊर्फ रोहीत शिवाजी आटोळे (रा . पोंदवडी ता . इंदापूर जि . पुणे) भाऊसाहेब आण्णा खारतोडे (रा . पोंदवडी ता . इंदापूर जि . पुणे) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २७ आॅक्टोंबर २०१९  रोजी ऐन दिवाळीत  सकाळी ९.३० च्या सुमारास पोंदवडी (ता . इंदापूर जि . पुणे )गावचे हददीत आबा थोरात याचे घराचे पाठीमागे हा प्रकार घडला आहे. आरोपींवर भादवि कलम ४२९ , ५०५ ( १ )  ( ब ) , प्राण्यांना कृरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० सुधारणा १९८२ चे कलम ११ ( १ ) ( ड ) प्रमाणे गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.
   आरोपी  गोट्या याने जेसीबी मशीनचे बकेटने गावामध्ये सैरावैरा पळणाऱ्या पांढरे रंगाचे बैलाला क्रुरतेने जखमी करुन  जीवे मारले. त्यानंतर बैलाला जेसीबीच्या बकेटमध्ये घालून गावातीलच महादेव मंदिराचे पाठीमागे पुरले. आरोपी भाऊसाहेब याने बैल हे गोवंशीय असुन सदर घटनेमुळे सार्वजनिक शांततेचा भंग होऊ शकते .याची जाणीव असताना देखील त्याचे मोबाईलवरून सोशल मीडियावर या घटनेचा व्हीडीओ प्रसिध्द केल्याचे फिर्यादीत नमुद केले आहे.
 फिर्यादीमध्ये हा प्रकार २७ ऑक्टोबर रोजी घडल्याचे नमुद केले आहे. त्यादिवशी दिवाळी सण सुरु होता,२७ तारखेला लक्ष्मीपुजनाचा सण होता.त्याच दिवशी या बैलाचा अमानुषपणे जीव घेतल्याचे पुढे आले आहे.जीवे मारण्यात आलेला बैल पिसाळलेला होता. याबाबत भिगवण पोलीसांना माहिती देण्यात आली होती,शिवाय वनविभागाला देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु होता.मात्र,याच दरम्यान त्या बैलाचा जीव अमानुषपणे घेण्यात आला.


——————————————
...अय बैल फुटला..बास बास 
    पोंदवडी गावात अमानुषपणे मारलेल्या बैलाचा व्हीडीओ एकुण २ मिनिटे ४१ सेकंदाचा आहे.यामध्ये बैलाला जेसीबी बकेटच्या सहाय्याने जीवे मारताना होणारा संवाद चीड आणणारा असा आहे. बैल जेसीबीने कसा मारतात, हे पहायचे आहे. त्यावर एक मुलगी म्हणजे त्याचा मर्डर करताना पहायचे का आपण ,अशा शब्दात संबंधितांना ते करणार असल्याच्या कृत्याची जाणीव करुन देताना ऐकावयास मिळते. तसेच जेसीबी चालकाला, गोट्या बकेट ने दाब, गोट्या वर उचलुन मुंडक्यावर दाब,त्याला काय व्हतय.अय बैल फुटला..बास बास ,असा अंगावर शहारे आणणारा संवाद या व्हीडीओमध्ये ऐकायला मिळत आहे.
—————————————————

... या भीतीने बैलाला जीवे मारण्यात आले
२७ ऑक्टोबर रोजी हा बैल रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या मागे,धावणाऱ्या दुचाकीच्या पाठीमागे पळून त्यांना मारण्याचा प्रयत्न करीत होता.तसेच चार दुचाकींची मोडतोड, एका घराचा दरवाजा तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे लोखंडी गेट तोडले. त्यामुळे गावातील लोक भीतीने सैरावैरा पळत असताना हा बैल गावातील लोकांना मारून जीवितहानी करेल या भीतीने त्या बैलाला जीवे मारण्यात आले आहे, असे भिगवण पोलीस ठाण्याच्या वतीने जाहीर
करण्यात आलेल्या प्रेसनोटमध्ये नमूद करण्यात आले आहे...
—————————————————

Web Title: crime registred against two person due to ox killed by JCB Bucket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.