केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या जनआशीर्वाद यात्रेप्रकरणी गुन्हा; गर्दी जमवल्याचा ठपका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 00:17 IST2021-08-29T00:16:46+5:302021-08-29T00:17:14+5:30
यात्रेच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी गर्दी जमली होती. तसेच यात्रेमध्येदेखील मोठ्या प्रमाणात पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती

केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या जनआशीर्वाद यात्रेप्रकरणी गुन्हा; गर्दी जमवल्याचा ठपका
नाशिक : एकीकडे कोरोनाच्या तीसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत असताना दुसरीकडे मात्र भाजपचे नवनिर्वाचित केंद्रीय आरोग्यराज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी शहरात शनिवारी (दि.२८) काढलेल्या जनआशिर्वाद यात्रा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शहर पोलिसांनी या यात्रेसाठी परवानगी नाकारल्याचे समोर आले असून कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असताना यात्रेनिमित्त गर्दी जमविल्याप्रकरणी भाजप शहराध्यक्ष गिरीष पालवे यांच्याविरुध्द अंबड पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.
अंबड पोलीस ठाणे हद्दीतील पाथर्डीफाटा येथून पवार यांच्या यात्रेला वाजत गाजत पोलीस बंदोबस्तात शनिवारी दुपारी प्रारंभ करण्यात आला. यात्रा अंबड पोलीस ठाणे हद्दीतून सुरु हाेऊन पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री उशीरा समाप्त झाली. दरम्यान, दुचाकीस्वारांनी या रॅलीत सहभागी होत पाथर्डीफाटा ते उंटवाडीदरम्यान ‘रोड-शो’ करत कोरोनाचे सर्व प्रतिबंधात्मक नियम धाब्यावर बसवून विनाकारण गर्दी जमविल्याचा ठपका अंबड पोलिसांकडून ठेवण्यात आला आहे. जनआशिर्वाद यात्रेच्या आयोजकांवर भादंवि कलम-१८८नुसार अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
दरम्यान, यात्रेच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी गर्दी जमली होती. तसेच यात्रेमध्येदेखील मोठ्या प्रमाणात पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गर्दी
उसळली होती. यावेळी कोवीड प्रतिबंधात्मक नियम सर्रासपणे पायदळी तुडविले गेल्याने पोलिसांकडून रात्री याप्रकरणी जनआशिर्वाद यात्रा आयोजकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया अन्य काही पोलीस ठाण्यांमध्येही रात्री उशिरापर्यंत सुरु होती. दरम्यान, या यात्रेला पोलिसांकडून परवानगी पोलीस आयुक्तालयाकडून नाकारण्यात आली होती. पंचवटी पोलीस ठाण्यामध्येसुद्धा याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत नोंद घेण्याचे काम सुरु होते.