महाराष्ट्राचे सहा आमदार पाचवी पास, फक्त १०वी शिकलेले ४४; पहा मतदारांनी निवडलेल्या नेत्यांचे शिक्षण...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 07:48 AM2024-10-01T07:48:32+5:302024-10-01T07:48:59+5:30
विधानसभेच्या २०१९च्या निवडणुकीत इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) यांनी केलेल्या विश्लेषणातून ही माहिती पुढे आली आहे.
- नारायण जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : महाराष्ट्रातील २८८ पैकी १७६ आमदारांवर गुन्हे दाखल आहेत. टक्केवारीत ही संख्या ६२ टक्के इतकी प्रचंड आहे. यात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आमदारांची संख्या ११३ अर्थात ४० टक्के इतकी आहे. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आमदारांमध्ये दोघांवर खुनाचा तर ११ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल आहेत. तर चौघांवर अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत.
विधानसभेच्या २०१९च्या निवडणुकीत इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) यांनी केलेल्या विश्लेषणातून ही माहिती पुढे आली आहे.
गुन्हे दाखल असलेल्या आमदारांमध्ये भाजपचे १०५ पैकी ६५ आमदार असून, ४० आमदारांवर गंभीर गुन्हे नोंद आहेत. शिवसेनेच्या ५५ पैकी ३१ आमदारांवर गुन्हे नोंद असून, २६ जणांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ३२ आमदारांवर विविध गुन्हे असून, १७ जणांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
काँग्रेसच्या ४४ पैकी २६ जणांवर गुन्हे नोंद असले तरी १५ जणांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. १२ अपक्षांपैकी ९ जणांवर विविध गुन्हे दाखल असून, यापैकी ६ जणांवर गंभीर गुन्हे नोंद असल्याचे अहवालात म्हटले आहे.
राज्यातील ६ आमदार डॉक्टरेट, तर १९ जण पाचवी ते आठवी पास
विधानसभेच्या २०१९च्या निवडणुकीत इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) यांनी केलेल्या विश्लेषणानुसार महाराष्ट्रातील २८८ पैकी २८५ आमदार शिक्षित आहेत. यात सहा जण डॉक्टरेट असून, ७२ जण पदवीधर तर १९ आमदार पाचवी ते आठवी पास आहेत. तिघांच्या अर्जाचे विश्लेषण
केलेले नाही.
विधानसभेच्या २०१९च्या निवडणुकीत सर्वपक्षीय आमदारांनी सादर केलेल्या शपथपत्रांच्या आधारे एडीआरने हे विश्लेषण केले आहे.
शिक्षणनिहाय आमदारांची संख्या
शिक्षित ४
पाचवी पास ६
आठवी पास १३
दहावी पास ४४
१२वी पास ५४
पदवीधर ७२
इतर पदवीधारक ५१
पदव्युत्तर ३५
डॉक्टरेट ६