‘राजकीय होर्डिंग्ज लावणाऱ्यांवर गुन्हे’
By admin | Published: January 7, 2017 03:57 AM2017-01-07T03:57:21+5:302017-01-07T03:57:21+5:30
निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने तिची कडक अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने केडीएमसीचे आयुक्त ई. रवींद्रन यांनी कार्यवाहीला प्रारंभ केला
कल्याण : कोकण विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने तिची कडक अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने केडीएमसीचे आयुक्त ई. रवींद्रन यांनी कार्यवाहीला प्रारंभ केला आहे. यात राजकीय होर्डिंग्ज, झेंडे लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, असे आदेश त्यांनी प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त लावलेले फलकही उतरवण्यात आले आहेत.
कोकण विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम बुधवारी जाहीर झाला. यामुळे आचारसंहिता लागू झाल्याने गुरुवारी सायंकाळी आयुक्त ई. रवींद्रन यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात, आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या. त्यात राजकीय बॅनर, झेंडे, होर्डिंग्ज लावणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले. याबाबतचे परिपत्रक सर्वच प्रभागांना पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, ठाकरे यांच्या स्मारकाच्या लोकार्पणानिमित्त कल्याण-डोंबिवली शहरांत कार्यक्रमाचे मोठमोठे बॅनर, होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. आचारसंहितेच्या कचाट्यात लोकार्पण कार्यक्रमही अडकला होता. परंतु, शुक्रवारी सायंकाळी निवडणूक आयोगाने कार्यक्रमाला परवानगी दिल्याने शिवसैनिकांचा उत्साह एकीकडे वाढला असताना दुसरीकडे प्रभाग अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे होर्डिंग्ज,
बॅनर आणि झेंडे जप्त करण्यास सुरुवात
केली. (प्रतिनिधी)
।शिवसैनिकांमध्ये नाराजी
स्मारकाच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या होर्डिंग्जवर महापालिकेने कारवाई केल्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यांच्यात आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये खटके उडण्याची चिन्हे आहेत.