महाराष्ट्रातील २० पैकी १५ मंत्र्यांवर गुन्हेगारी खटले; ADR चा खळबळजनक रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 01:50 PM2022-08-12T13:50:32+5:302022-08-12T13:50:59+5:30

या मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्र्यांसह २० मंत्री झाले आहेत. कॅबिनेट विस्तारानंतर असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉचने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचा आढावा घेतला.

Criminal cases against 15 out of 20 Maharashtra ministers report of ADR | महाराष्ट्रातील २० पैकी १५ मंत्र्यांवर गुन्हेगारी खटले; ADR चा खळबळजनक रिपोर्ट

महाराष्ट्रातील २० पैकी १५ मंत्र्यांवर गुन्हेगारी खटले; ADR चा खळबळजनक रिपोर्ट

Next

मुंबई - राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर महिना उलटला तरी मंत्रिमंडळ विस्तार झाला नव्हता. विरोधकांनी सातत्याने यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोंडी केली. त्यानंतर अखेर ३८ दिवसांनी राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा पार पडला. मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात १८ जणांनी शपथ घेतली. आता शपथ घेणाऱ्या मंत्र्यांबाबत असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स(ADR) नं एक रिपोर्ट जारी केला आहे. 

या एडीआर रिपोर्टमध्ये राज्यातील ७५ टक्के मंत्र्यांविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचं समोर आले आहे. मंत्र्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातही याचा उल्लेख आहे. महाराष्ट्रात ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. ३८ दिवसांनी ९ ऑगस्टला राज्यात १८ मंत्र्यांचा शपथविधी सोहळा राजभवन येथे पार पडला. 

या मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्र्यांसह २० मंत्री झाले आहेत. कॅबिनेट विस्तारानंतर असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉचने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचा आढावा घेतला. त्यानुसार, मंत्रिमंडळातील १५ म्हणजे ७५ टक्के मंत्र्यांवर गुन्ह्याची नोंद आहे. त्यातील १३ मंत्र्यांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. सर्व मंत्री कोट्यधीश आहेत साधारण मंत्र्यांची संपत्ती सरासरी ४७ कोटींपर्यंत आहे. 

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सध्या कुठल्याही महिलेचा समावेश नाही. ८ मंत्र्यांची शैक्षणिक पात्रता १० वी, १२ वी इतकी आहे. तर ११ मंत्र्यांमध्ये पदवीधर आणि त्याहून अधिक शैक्षणिक पात्रता आहे. एका मंत्र्यांकडे डिप्लोमा आहे. तर ४ मंत्र्यांचे वय ४१-५० वयोगटातील आहे. इतरांचे वय ५१-७० वयोगटात आहे. १८ मंत्र्यांमध्ये ९ भाजपाचे आणि ९ शिंदे गटाचे मंत्री आहेत.  

संपत्ती किती?
शिंदे-फडणवीस सरकारमधील सर्व मंत्री कोट्यधीश आहेत. मुंबईतील मलबार हिलचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे सर्वाधिक संपत्ती आहे. व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक असलेल्या लोढा यांच्याकडे ४४१ कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे. लोढा यांच्याकडे २५२ कोटी रुपयांची जंगम आणि १८९ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. याशिवाय त्याच्याकडे १४ लाख रुपयांची जग्वार कार आणि शेअर बाजारात काही गुंतवणूक आहे. लोढा यांचे दक्षिण मुंबईतही ५ फ्लॅट आहेत. लोढा यांच्यावरही पाच गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Criminal cases against 15 out of 20 Maharashtra ministers report of ADR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.