गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण वाढले
By admin | Published: November 6, 2015 02:19 AM2015-11-06T02:19:07+5:302015-11-06T02:19:07+5:30
भाजपाची सत्ता आल्यावर महाराष्ट्र पोलिसांनी गुन्हे सिद्ध करण्याचे प्रमाण आठ वरुन ४२ टक्क्यांवर नेले आहे. परिणामी देशात आपला गुन्हे सिद्ध करण्यात पाचवा क्रमांक आला आहे,
ठाणे : भाजपाची सत्ता आल्यावर महाराष्ट्र पोलिसांनी गुन्हे सिद्ध करण्याचे प्रमाण आठ वरुन ४२ टक्क्यांवर नेले आहे. परिणामी देशात आपला गुन्हे सिद्ध करण्यात पाचवा क्रमांक आला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सांगितले. कोकण परिक्षेत्रातील १०२ व्यक्तींचा चोरी गेलेला मुद्देमाल त्यांना परत करण्याचा कार्यक्रम डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात झाला. १५ जणांना दोन कोटी ७९ लाखांच्या मुद्देमालाचे प्रातिनिधीक अभिहस्तांतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्यमंत्री म्हणाले की, ‘एखाद्याचा मुद्देमाल चोरी गेल्यानंतर तो वर्षानुवर्षे परत मिळत नाही. त्यासाठी कोर्टात खेटे मारावे लागतात. यातून दुहेरी त्रास होतो. अशा प्रकारे मुद्देमाल हस्तांतराचा उपक्र म राज्यातल्या सर्व पोलीस ठाण्यांनी राबवावा. त्यातून नागरिकांमध्ये पोलिसांबाबत विश्वासाची भावना निर्माण होऊन पोलिसांना नागरिकांचे सहकार्य मिळेल.’
एफआयआर अॅप्लिकेशनचेही उद्घाटन
या कार्यक्र मादरम्यान महिला - जेष्ठ नागरिक यांच्या सुरक्षेसाठी तयार केलेल्या फर्स्ट इमिजिएट रिस्पॉन्स (एफआयआर) या मोबाइल अॅप्लिकेशनचे फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या अॅपमुळे संकटात सापडलेल्या महिला, ज्येष्ठ नागरिकांना जीपीएसच्या माध्यमातून पोलिसांची मदत मिळणार आहे. पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारल्याने त्यांची कार्यक्षमता वाढून कामकाज पारदर्शी होणार असल्याचेही ते म्हणाले.