गुन्हेगारीत तरुणाईच आघाडीवर

By admin | Published: April 11, 2016 12:35 AM2016-04-11T00:35:44+5:302016-04-11T00:35:44+5:30

शहरात गेल्या काही महिन्यांपासून चोरी, घरफोडी, लूटमार, खून आदी घटनांचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरू असून, यातील आरोपीही पोलिसांनी गजाआड केले आहेत.

The criminal is on the front of the youth | गुन्हेगारीत तरुणाईच आघाडीवर

गुन्हेगारीत तरुणाईच आघाडीवर

Next

वाढत्या घटना : आरोपींमध्ये युवकांचीच संख्या जादा, पिंपरी ठाण्याच्या हद्दीमध्ये सर्वाधिक खून
सचिन देव, पिंपरी
शहरात गेल्या काही महिन्यांपासून चोरी, घरफोडी, लूटमार, खून आदी घटनांचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरू असून, यातील आरोपीही पोलिसांनी गजाआड केले आहेत. मात्र, यातील आरोपींमध्ये सर्वाधिक आरोपी हे २० ते २५ वयोगटातीलच युवक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये काही अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. किरकोळ कारणावरून टोकाची भूमिका घेणे, अशा प्रकारची गुन्हेगाराची मनोवृत्ती युवकांमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे.
मागील वर्षी परिमंडळ तीनच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी, निगडी, चिंचवड, एमआयडीसी, चतु:श्रृंगी, हिंजवडी, सांगवी आणि वाकड या ठिकाणी ३९ खुनाच्या घटना झाल्या, तर खुनाचा प्रयत्न करणाऱ्या ५० घटना घडल्या. यामध्ये सर्वाधिक खुनाच्या १० घटना पिंपरीत घडल्या. या गंभीर गुन्ह्यातील अटक केलेल्या आरोपींमध्ये बहुतांश आरोपी हे २० ते २५ वयोगटातील आहेत.
यामध्ये काही सराईत गुन्हेगाराचांही समावेश आहे. पोलीस ठाण्यांमध्ये असलेल्या विविध गुन्ह्यांच्या नोंदीमध्ये युवकांचेच प्रमाण जास्त असून चोरी, घरफोडी आणि खुनाच्या गुन्ह्यांमध्येच युवकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. मागील वर्षी दुचाकी ,सोनसाखळी चोरी, घरफोडी, लूटमार, खून, खुनाचा प्रयत्न या घटनांचा चढता क्रम असतानाच यंदाही या गुन्हयांचा आलेख चढताच आहे. यांमध्ये युवकांचाच समावेश असल्याचे समोर आले आहे.
यंदाही २०१६ मध्ये नववर्षाच्या सुरुवातीलाच पैैसे मागितल्याच्या कारणावरून नेहरुनगरात एकाने दुकान मालकास मारहाण केली होती. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपीना अटक केल्यानंतर तो युवक २२ वर्षांचा आढळून आला होता. त्यानंतर जानेवारी महिन्यात हिंजवडी पोलिसांनी दरोडा टाकणाऱ्यांमध्ये एक आरोपी अल्पवयीन, तर उर्वरित आठ जण १९ ते २२ वयोगटातील होते. या आठ जणांवर हिंजवडी पोलीस ठाण्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने या आरोपींवर सध्या मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यातही वाकड येथे किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीनंतर दहा जणांच्या टोळक्याने दोन जणांवर कोयत्याने वार केले होते. यामध्ये एका २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला होता. यामध्ये अटक केलेल्या आरोपींमध्ये दोन आरोपी हे अल्पवयीन, तर उर्वरित आरोपी हे २० ते २५ वयोगटातील होते. निगडी येथे किरकोळ कारणावरून सहा जणांच्या टोळक्याने एका शालेय विद्यार्थ्यांचे अपहरण करून खून करण्याचा प्रयत्न केला होता. आरोपींमध्ये सर्व आरोपी हे २० ते २२ वयोगटातील होते.
> तडीपार गुंडांचा शहरात वावर
पिंपरी : कोणाला एक तर कोणाला दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार केले असताना, आदेशाचा भंग करून राजरोसपणे गुंडांचा शहरात वावर असल्याचे निदर्शनास आले आहे. पोलिसांच्या दृष्टीने सामाजिक स्वास्थ्याला बाधा आणणाऱ्या गुंडांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून विशिष्ट कालावधीसाठी तडीपारीची कारवाई केली जाते. परंतु त्या गुंडांचा वावर येथेच दिसून येत असेल, तर कारवाईला अर्थच उरला नसल्याच्या संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार केलेला ज्ञानेश्वर त्रिंबक नलावडे (वय २३, बालाजीनगर), एक वर्षासाठी तडीपार केलेले नितीन सदाशिव वाघमारे, समाधान माणिक मोरे (वय २०) असे तीनजण तडीपारीनंतर अवघ्या २० दिवसांत भोसरी परिसरात पोलिसांना आढळून आले. त्यांना पोलिसांनी अटक केली.
दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार केलेल्या जालिंदर ऊर्फ जाल्या राजू निकम (वय २४, रा. नाणेकर चाळ, पिंपरी) या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वी अटक केली होती. परिमंडल तीन उपायुक्त कार्यालयाच्या हद्दीतील ४७ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. सहा महिन्यांपूर्वी तडीपारीची ही कारवाई झाली असली, तरी वेळोवेळी तडीपार गुंड शहरातच आढळून येऊ लागले आहेत. अनेकदा त्यांचा गुन्ह्यामध्ये सहभाग दिसून येऊ लागला आहे. तडीपारीची कारवाई कागदोपत्री आहे, अशी शंका नागरिकांच्या मनात निर्माण होऊ लागली आहे.
> घरातील वातावरण
ठरतेय कारणीभूत
लहानपणापासूनच युवकांवर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा परिणाम होत असतो. आणि याला घरातील वातावरणही कारणीभूत असते. भांडण, हाणामारी या घटनांमुळे बालकांच्या मनावर वाईट परिणाम होऊन त्यांच्या मनावर त्याच गोष्टी बिंबवल्या जातात. यासाठी आई-वडिलांनी घरात कायमस्वरूपी मुलावर चांगले संस्कार घडतील, असे वातावरण तयार करावे. मुलांना शिक्षणाबरोबरच विविध राष्ट्र पुरूषांचा आदर्श सांगावा. ज्यामुळे मुलांच्या मनात नकारात्मक विचार न येता सकारात्मक विचार निर्माण होतील.सामाजिक संस्थांनी या मुलांचे समुपदेशन करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
- डॉ. किशोर गुजर,
मानसोपचार तज्ज्ञ,
वायसीएम रूग्णालय,पिंपरी.
> ‘मुलांसमोर राष्ट्रपुरूषांचा आदर्श ठेवावा’
आई-वडिलांनी मुलांना लहानपासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या कर्तृत्वाचाआदर्श सांगावा. ज्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन आणि उत्तम संस्कार होतील. तसेच मुले शाळेत जातात की नाही, की मित्रांसोबत इतरत्र फिरतात. याची स्वत: शाळेत जाऊन पहाणी करावी. लहानपणापासूनच बालकांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन रुजविल्यास निश्चितच मोठेपणी आदर्श युवक घडेल. यातूनच युवकांमधील वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण निश्चितच कमी होईल. शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पालकांनीही मुलांच्या सवयीकडे आणि संगतीकडे लक्ष दिले पाहिजे.
- मोहन विधाते,
सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी
> दुचाकी चोरी, मोबाइल चोरीत
अल्पवयीन चोरटे
काही दिवसांपूर्वी पिंपरी गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने एका चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना पाच चोरट्यांना पकडले होते. त्यांच्याकडून ४ लाख ९० हजार रुपये किमतीच्या १२ दुचाकी जप्त केल्या होत्या. विशेष म्हणजे या पाच चोरट्यांमध्ये चार जण अल्पवयीन निघाले. या अल्पवयीन बालकांनी चैनी, मौजमजेसाठी आणि मित्रांवर प्रभुत्व गाजविण्यासाठी दुचाकी चोरून वापरायची आणि नंतर कोठेही सोडून द्यायची,असे पोलिसांना सांगितले. तसेच मागील पंधरा दिवसांपूर्वी हिंजवडी पोलिसांनी गस्तीवर असताना एका चोरट्याला पकडले होते. तोही चोरटा अल्पवयीन निघाला असून, त्याच्याकडून सात दुचाकी जप्त केल्या होत्या.
तसेच तीन महिन्यांपूर्वी शहरात मोठ्या प्रमाणात वाहन तोडफोडीचे सत्र सुरू होते. यामध्ये ताब्यात घेतलेल्या १३ आरोपींमध्ये सहा आरोपी हे अल्पवयीन असल्याचे समोर आले होते. या वेळी या आरोपींनी समाजात दहशत अणि इतर टोळक्यांवर प्रभाव पाडण्यासाठी वाहनांची चोरी केल्याचे कबूल केले होते. आता चार दिवसांपूर्वीच गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने पिंपरी-चिंचवड परिसरातून लॅपटॉप व मोबाइल चोरणाऱ्या तीन चोरट्यांना आकुर्डी परिसरातून अटक केली होती.
पोलीस प्रशासनाने गेल्या दोन वर्षांत खून, दरोडा, लूटमार प्रकरणातील ४८ गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली असून, या तडीपारांमध्येही सर्वाधिक २० ते २५ वयोगटातीलच युवकांचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक तडीपारीची कारवाई पिंपरी, निगडी, हिंजवडी आणि वाकड या भागातील तरुणांवर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ४८ गुन्हेगारांमध्ये सर्व जण ३० वयोगटाच्या आतीलच आहेत. दरम्यान, गुंडगिरी करणाऱ्या काही युवकांवर लवकरच तडीपारीची कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

Web Title: The criminal is on the front of the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.