लाचखोर पोलिसाला अटक
By admin | Published: October 6, 2014 05:22 AM2014-10-06T05:22:38+5:302014-10-06T12:04:09+5:30
साक्षीदारांना न्यायालयात हजर न करण्यासाठी व्यापाऱ्याकडे १ लाख रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकास आज लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिका-यांनी अटक केली
मुंबई : साक्षीदारांना न्यायालयात हजर न करण्यासाठी व्यापाऱ्याकडे १ लाख रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकास आज लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. प्रकाश पाटील असे या आरोपी पोलिसाचे नाव असून, तो अर्थिक गुन्हे शाखा युनिट ७ येथे कार्यरत आहे.
बोरीवलीतील एका व्यापाऱ्यावर काही दिवसांपूर्वी आर्थिक गुन्हे शाखेने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर व्यापाऱ्याविरोधात सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. यात न्यायालयाने या व्यापाऱ्याची मालमत्ता जप्त करून यात चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखा युनिट ७चे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील तपास करीत होता. या गुन्ह्यात व्यापाऱ्याविरोधात साक्षीदार तयार केले होते. साक्षीदारांना न्यायालयात हजर न करण्यासाठी व्यापाऱ्याकडे पाटील याने २ लाखांची लाच मागितली. व्यापाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दाखल केली. आज अधिकाऱ्यांनी बोरीवलीतील एका हॉटेलमध्ये सापळा रचला. या वेळी ४० हजारांचा पहिला हप्ता स्वीकारताना त्याला अटक केली. (प्रतिनिधी)