बीआरटी मार्गात अपघातसत्र

By admin | Published: May 16, 2016 01:03 AM2016-05-16T01:03:36+5:302016-05-16T01:03:36+5:30

नगर रस्ता बीआरटी सुरू होऊन १८ दिवस झाले; मात्र या बीआरटीमार्गात मार्ग सुरू झाल्यापासून अपघातांचे सत्र सुरूच आहे

Criminal trauma on BRT road | बीआरटी मार्गात अपघातसत्र

बीआरटी मार्गात अपघातसत्र

Next

चंदननगर : नगर रस्ता बीआरटी सुरू होऊन १८ दिवस झाले; मात्र या बीआरटीमार्गात मार्ग सुरू झाल्यापासून अपघातांचे सत्र सुरूच आहे. शनिवारी (दि.१४) दिवसभरात नगर रस्त्यावर बीआरटीमार्गात विविध ठिकाणी तीन विचित्र अपघात झाले. सर्वप्रथम खराडी दर्गा या ठिकाणी खासगी चारचाकी वाहन बीआरटी- मार्गात घुसले व त्याने रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस्वाराला उडविले. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. दुसरा अपघात रामवाडी विमानतळ पोलीस स्टेशन समोरील ठिकाणी झाला. या बसने ज्येष्ठाला उडविले. यात ज्येष्ठ गंभीर जखमी झाला. तिसरा अपघात इनॉर्बिट मॉल समोरील सोमनाथ नगरला जाणाऱ्या फाट्यात झाला. बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने या बसने बीआरटीची सीमाभिंत व सिग्नलचा चक्काचूर केला. यात बसचेही मोठे नुकसान झाले आहे.
या सोमनाथनगरला जाणाऱ्या रस्त्यावर बीआरटीच्या मार्गात जाण्यासाठी मार्ग काढण्यात आला आहे; मात्र बीआरटी मार्गाच्या नकाशात हा फाटाच नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हट्टामुळे या ठिकाणी सोमनाथनगरला जाणारा रस्ता बनविण्यात आला आहे. हा रस्ता बंद केल्यास, अपघात होणार नाही.
नगर रस्ता बीआरटीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र, योग्य पद्धतीने जनजागृती न केल्याने नुकसान, अपघात होत आहेत. बीआरटी मार्ग हा खासगी वाहनांसाठी नसून, तो फक्त बससाठी आहे. मात्र, मार्गात सर्रास खासगी वाहने घुसत आहेत. नेमलेल्या वार्डनलाही खासगी वाहनचालक जुमानत नाहीत. नगर रस्त्यावरील पथदिवेही रात्रीच्या वेळी बंद असतात. (वार्ताहर)
जनजागृतीचीही आवश्यकता
बसचालकही बेफाम बस चालवित आहेत. त्यांच्या वेगालाही मर्यादा असल्या पाहिजेत. रामवाडीत विमानतळ पोलीस स्टेशन समोर नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे टाकले आहेत. मात्र, बसचालक याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळेच या ठिकाणी अधिक अपघात होत आहेत. याच ठिकाणी बीआरटी मार्ग सुरू झाल्यापासून पाचवा अपघात घडला आहे. यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.
कारण, पुढल्या महिन्यात शाळा सुरू झाल्यावर, मोठी समस्या निर्माण होऊ शकते. सध्या शाळांना सुट्या आहेत. रामवाडीतील रामजी मालोजी आंबेडकर व लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालय या शाळेत ८०० विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यात वडगाव शेरीला जाण्यासाठी सर्व मुले त्यांचा जीव मुठीत धरून रस्ता ओलांडत असतात. त्यांच्यासाठी पालिका प्रशासनाने वेळीच उपाययोजन करणे गरजेचे आहे. अन्यथा, मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागणार आहे.

Web Title: Criminal trauma on BRT road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.