गुन्हेगारांचे ‘चरित्र’ आता एका क्लिकवर उपलब्ध
By admin | Published: January 3, 2017 05:42 AM2017-01-03T05:42:13+5:302017-01-03T05:42:13+5:30
जिल्ह्यातील कुठल्याही पोलीस ठाण्यात छोट्यात छोटा गुन्हा दाखल असलेल्या गुन्हेगाराचे ‘चरित्र’ ठाणे पोलिसांनी विकसीत केलेल्या सॉफ्टवेअरमुळे अवघ्या काही मिनिटांमध्ये उलगडणार
जितेंद्र कालेकर, ठाणे
जिल्ह्यातील कुठल्याही पोलीस ठाण्यात छोट्यात छोटा गुन्हा दाखल असलेल्या गुन्हेगाराचे ‘चरित्र’ ठाणे पोलिसांनी विकसीत केलेल्या सॉफ्टवेअरमुळे अवघ्या काही मिनिटांमध्ये उलगडणार असल्याने गुन्हेगारीला चाप लावण्यास मोठा हातभार लागणार आहे. राज्यात प्रथमच अशा प्रकारच्या सॉफ्टवेअरचा उपयोग होत असून ठाण्यातील यशस्वीतेनंतर संपूर्ण राज्यभरातील पोलिसांना त्याचा लाभ घेता येणार असल्याची माहिती एका वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली.
ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि सह पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी एका खासगी कंपनीच्या मदतीने हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. ठाणे आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, कल्याण आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळातील ३३ पोलीस ठाण्यांमध्ये गेल्या १५ ते २० वर्षांमध्ये दाखल झालेले गुन्हे, त्यामधील गुन्हेगारांच्या नाव, पत्यासह एका क्षणात उपलब्घ होणार आहे. त्यामुळे एखाद्याविरुद्ध कोणत्याही पोलीस ठाण्यात साधी छेडछाडीची तक्रार एखाद्या तरुणीने केली तर ज्याच्याविरुद्ध तक्रार आली, त्याचे केवळ नाव संगणकावर टाकताच त्याचे गुन्हेगारी ‘चरित्र’लागलीच समोर येईल. त्यामुळे ज्याच्याविरुद्ध छेडछाडीची तक्रार आली आहे, त्याच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत किंवा कसे ते लागलीच कळेल व परिणामकारक कारवाई करणे सोपे होणार आहे. हाणामारी, चोरी, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलीस संबंधित आरोपीवर चॅप्टर केस करतात. त्याच्याकडून चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र घेतले जाते. मग, असे हमीपत्र दिले असतांनाहर पुन्हा हाणामारीच्या किंवा खुनाच्या प्रयत्नात तोच आरोपी आढळल्यास त्याचे आधीचे हमीपत्र रद्द करण्याची प्रक्रिया करुन पुन्हा नव्याने हमीपत्र देईपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडीत टाकण्याची तजवीज होणार आहे.