‘सीरिअल किलर’च्या क्रौर्याचा पर्दाफाश !
By admin | Published: December 9, 2014 10:34 PM2014-12-09T22:34:41+5:302014-12-09T23:17:42+5:30
कऱ्हाड-औंधमधील हत्यासत्र : दागिन्यांसाठी तिघींचा बळी, एकीवर खुनी हल्ला
कऱ्हाड : दागिन्यांसाठी वृद्ध महिलांचा खून करणाऱ्या ‘सीरिअल किलर’चा कऱ्हाड तालुका पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या आरोपीकडून आतापर्यंत तीन खून व एक खुनाचा प्रयत्न असे चार गंभीर गुन्हे उघडकीस आलेत. रक्तपात करून त्याने चोरलेल्या दागिन्यांपैकी काही ऐवज पोलिसांच्या हाती लागला असून, इतर मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.
वडोली-निळेश्वर (ता. कऱ्हाड) येथील यशोदा भोसले या वृद्धेचा खून झाल्यानंतर कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपासाची चक्रे फिरवली. जिल्ह्यात ठिकठिकाणी अशा पद्धतीने झालेल्या गुन्ह्यांचा पोलीस पथकाने मागोवा घेतला.
या सर्व प्रकरणांत एकाच आरोपीचा हात असावा, अशी शक्यता निर्माण झाली. अशातच या प्रकरणात काशिनाथ काळे याचा हात असल्याची माहिती समोर आली. रविवारी (दि. ७) रात्री काशिनाथ काळे कऱ्हाडातील प्रभात चित्रमंदिरात चित्रपट पाहण्यासाठी आला असताना सहायक निरीक्षक स्वप्निल लोखंडे, हवालदार सज्जन जगताप, खलील इनामदार यांनी पाठलाग करून त्याला पकडले.
कसून तपास केल्यानंतर गुन्ह्याची कबुली देत त्याने वडोली-निळेश्वरमधील यशोदा भोसले यांचे चोरलेले दागिने पोलिसांच्या स्वाधीन केले. वडोलीतील खुनाबरोबरच त्याच्याकडून अन्य तीन गुन्हेही उघडकीस आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाड येथे जुन्या कोयना पुलानजीक २२ सप्टेंबर २०१३ रोजी लीलाबाई अण्णा पवार (वय ६५) या वृद्धेचा (पान १० वर)
काशिनाथ काळेची गुन्हेगारी पार्श्वभूमी व त्याच्याकडून निष्पन्न झालेले गुन्हे पाहता प्रतिकार न करू शकणाऱ्या वृद्ध महिलांवरच अत्यंत क्षुल्लक कारणासाठी त्याने हल्ले केल्याचे उघड झाले आहे. त्याच्याकडे कसून चौकशी सुरू असून, आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. आरोपीबाबत आणखी काही माहिती असल्यास नागरिकांनी ती पोलिसांना द्यावी. संबंधिताचे नाव गुप्त ठेवले जाईल.
- मितेश घट्टे,
पोलीस उपअधीक्षक, कऱ्हाड
दारू, चित्रपटावर उधळले पैसे
काशिनाथ काळेने महिलांचा खून करून चोरलेले काही दागिने विकले. त्यातून मिळालेल्या पैशांतून तो दररोज मद्यप्राशन करीत होता. थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहत होता. तसेच काही वेळा तो वेश्यावस्तीत जाऊन आल्याचेही आजपर्यंतच्या तपासात स्पष्ट झाले.