झाडीपट्टी रंगभूमीवरील संकट अटळ; कलावंत मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना घालणार साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 03:16 AM2020-09-13T03:16:56+5:302020-09-13T03:17:19+5:30
दरवर्षी सुमारे सव्वाशे कोटी रुपयांची उलाढाल होणाऱ्या झाडीपट्टी रंगभूमीद्वारे हजारो कलाकारांचा चरित्रार्थ चालतो.
- प्रवीण खापरे
नागपूर : झाडीपट्टी नाट्यनिर्माता संघटनेच्या ९ सप्टेंबरला झालेल्या बैठकीत शासनाकडून परवानगी मिळेपर्यंत नाट्य सादरीकरणाबाबत कोणताही निर्णय न घेण्याचे जाहीर झाले. तेव्हापासून झाडीपट्टी रंगभूमीवरील निर्मात्यांमध्ये प्रचंड संभ्रम दिसत आहे. नाट्यकलावंत कसे जगतील, असा प्रश्न असल्याने यंदा झाडीपट्टी रंगभूमीवर संकट अटळ आहे.
दरवर्षी सुमारे सव्वाशे कोटी रुपयांची उलाढाल होणाऱ्या झाडीपट्टी रंगभूमीद्वारे हजारो कलाकारांचा चरित्रार्थ चालतो. झाडीपट्टी वगळता नागपूर, अमरावती, अकोला, मुंबई, पुणे अशा शहरांतून मोठ्या संख्येने कलावंत येतात. ही शहरे कोरोना हॉटस्पॉट म्हणून आधीच नोंदली गेली आहेत. अशा स्थितीत नाटकांचा फड उभा राहिला आणि या शहरांतून कलावंत संक्रमित होऊन आले तर त्याचा फटका नाट्यमंडळ व प्रेक्षकांना बसण्याची भीती आहे. संकटकाळात मदत मिळावी यासाठी अखिल झाडीपट्टी नाट्य महामंडळाचे पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.
झाडीपट्टी रंगभूमीवर दरवर्षी शासनाला सात ते आठ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होतो. यंदा ही रंगभूमी रंगणार नाही, अशीच शक्यता दिसते. आम्हाला शासनाच्या मदतीची अपेक्षा आहे. - प्रल्हाद मेश्राम,
सचिव, अ. झाडीपट्टी नाट्य महामंडळ