कोरोनाचे शाळांवर संकट! पहिली ते बारावीपर्यंतच्या पाठ्यक्रमात २५ टक्के कपात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 05:59 AM2020-07-26T05:59:49+5:302020-07-26T06:01:52+5:30

भाषेचे व्याकरण कायम । प्रात्यक्षिकांचा निर्णय सुविधा पाहून घेण्याचे निर्देश

Crisis of Corona on schools! 25% reduction in courses from 1st to 12th | कोरोनाचे शाळांवर संकट! पहिली ते बारावीपर्यंतच्या पाठ्यक्रमात २५ टक्के कपात

कोरोनाचे शाळांवर संकट! पहिली ते बारावीपर्यंतच्या पाठ्यक्रमात २५ टक्के कपात

Next

मुंबई : करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा आतापर्यंत शाळा बंद असून आॅनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्यात समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांतील इयत्ता पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी २५ टक्के कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.


या निर्णयानुसार, अभ्यासक्रमाचा मूळ गाभा तसाच ठेवून प्राथमिक स्तरावरील २२, माध्यमिक २० व उच्च माध्यमिक स्तरावरील ५९ असे अशा एकूण १०१ विषयांचा इयत्तानिहाय, विषयनिहाय २५ टक्के पाठ्यक्रम कमी केला आहे. १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू झाले. आॅनलाइनच्या माध्यमातून विविध शाळांनी शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. परंतु आॅनलाइन शिक्षणामधील विविध अडचणी व विद्यार्थ्यांवर पडणारा ताण याचा विचार करून हा निर्णय घेतला असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना राज्य शैक्षणिक संशोधक परिषदेच्या संचालकांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

‘परीक्षांची संख्या कधी निश्चित करणार?’
विविध शिक्षक संघटना आणि शिक्षक, शाळांच्या मागणीनंतर बऱ्याच दिवसांनंतर राज्य शिक्षण विभागाने केवळ २५% अभ्यासक्रम कपात केला आहे. सीबीएसई मंडळाने आपल्या अभ्यासक्रमात ३० टक्के कपात केली आहे. सीबीएसई मंडळाशी तुलना करता शिक्षण विभागाचा २५ टक्के अभ्यास कपातीचा निर्णय असमाधानकारक असल्याचे मत शिक्षक लोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी व्यक्त केले.
शिक्षण विभागाने या निर्णयाची घोषणा केली असली तरी घटक चाचण्या किती, कशा घ्याव्यात, वर्षभरातील परीक्षांचे नियोजन कसे करावे याबाबत मार्गदर्शन केलेले नाही. त्यामुळे विनाकारण विद्यार्थी, पालक संभ्रमात आहेत. यासंदर्भात निर्णय घ्यायला आणखी किती वेळ लावणार, असा सवाल शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केला आहे.

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीपूर्व परीक्षा स्थगित
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र २०२० मधील विविध विद्याशाखांच्या पदवीपूर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी शनिवारी दिली
सोयी-सुविधांनुसार विचार
शालेय श्रेणीच्या विषयांसंदर्भात स्थिती व त्यानुसार उपलब्ध सोयीसुविधांचा विचार करून प्रकल्प / उपक्रम हाती घेण्याच्या सूचना एससीईआरटीने केल्या. प्रात्यक्षिकांवर आधारित प्रात्यक्षिक विषयांचे कार्य हे अध्ययन - अध्यापन संदर्भात विचारात घेतलेल्या आशयास अनुसरून उपलब्ध सोयीसुविधांनुसार पूर्ण करण्याच्या सूचनाही शाळांना देण्यात आल्या आहेत.

स्वाध्याय कृती वगळल्या
कमी केलेल्या पाठ्यक्रमामध्ये भाषा विषयांत काही गद्य व पद्य पाठ आणि त्यावरील स्वाध्याय कृती वगळल्या आहेत.
त्यामुळे २०२०-२१ मधील अंतर्गत मूल्यमापन किंवा वार्षिक परीक्षांमध्ये या घटकांवर कोणतेही प्रश्न विचारले जाऊ नयेत, असे राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेने स्पष्ट केले आहे.
मात्र भाषा विषयातील वगळलेल्या पाठाला जोडून आलेले व्याकरण आणि इतर भाषिक कौशल्य वगळले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

कमी करण्यात आलेला अभ्यासक्रम पाहण्यासाठी संकेतस्थळ www.maa.ac.in .

Web Title: Crisis of Corona on schools! 25% reduction in courses from 1st to 12th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.