मराठवाड्यात साडेतीन लाख हेक्टरवरील पिकांवर अस्मानी संकट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 06:35 AM2020-09-28T06:35:39+5:302020-09-28T06:35:57+5:30
६ लाख शेतकऱ्यांना फटका
औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील सुमारे साडेतीन लाख हेक्टरवरील पिकांवर अस्मानी संकट ओढावले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार विभागातील ३० तालुक्यांत १,८९८ गावांतील सुमारे ६ लाख शेतकऱ्यांचे ३ लाख ३० हजार हेक्टरवरील खरीप हंगामातील पीक हातून गेले आहे. पंचनामे आणि पीकपाहणी सुरू असून, यामध्ये आणखी भर पडण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यापर्यंतची ही स्थिती आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील ७९२ गावांतील ९८ हजार शेतकºयांचे नुकसान झाले आहे. लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील पंचनामे सुरू आहेत. नांदेड जिल्ह्यातील ३ तालुक्यांतील १,३५२ हेक्टर, परभणी जिल्ह्यातील २० हेक्टर, हिंगोली जिल्ह्यातील ५ तालुक्यांतील ५ हजार ८६१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
अहवाल मंत्रिमंडळात ठेवणार
मराठवाड्यातील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असून, मदतीसाठी केंद्रशासनाकडे मागणी करण्यात येईल, तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत अहवाल ठेवण्यात येईल, अशी माहिती कृषिमंंत्री दादा भुसे यांनी ‘लोकमत’ला रविवारी दिली. शनिवार, रविवारी भुसे यांनी सोलापूरसह ७ जिल्ह्यांतील पिकांची पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला.