विधानसभेत रणकंदन; कामकाज गुंडाळले, परिचारकांची बडतर्फी अन् मुंडेंच्या निलंबनाच्या मागणीवरून अभूतपूर्व गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 05:08 AM2018-03-06T05:08:47+5:302018-03-06T05:08:47+5:30
आॅडिओ क्लिपवरून वादाच्या भोव-यात अडकलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निलंबनासाठी तसेच सैनिकांचा अपमान करणारे भाजपा पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांच्या बडतर्फीच्या मागणीवरून आज विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ झाला.
- विशेष प्रतिनिधी
मुंबई - आॅडिओ क्लिपवरून वादाच्या भोवºयात अडकलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निलंबनासाठी तसेच सैनिकांचा अपमान करणारे भाजपा पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांच्या बडतर्फीच्या मागणीवरून आज विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ झाला.
सत्ताधारी व विरोधकांनी आमनेसामने येऊन दिलेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले. शेवटी अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. परिचारकांच्या बडतर्फीच्या मागणीवरून भाजपा विरुद्ध इतर पक्ष एकवटल्याचे चित्र होते.
कामकाज सुरू होताच शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी परिचारकांच्या बडतर्फीची मागणी केली. परिचारक यांनी सैनिकांचा केलेला अपमान हा देशद्रोहापेक्षाही भयंकर असल्याचे ते म्हणाले. शिवसेनेचे सदस्य या बडतर्फीच्या मागणीसाठी वेलमध्ये उतरून घोषणा देऊ लागले. त्याचवेळी भाजपाचे सदस्य आक्रमक होत पुढे आले आणि धनंजय मुंडेंच्या निलंबनाच्या मागणीवरून त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. या गदारोळात अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब केले. कामकाज पुन्हा सुरू झाले तेव्हा शिवसेनेच्या सदस्यांनी परिचारकांच्या निषेधाचे कापडी फलक फडकविले. त्यातच भाजपाच्या सदस्यांनी मोकळ्या जागेकडे धाव घेत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना निलंबित करण्याची घोषणा देत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी परिचारक यांना बडतर्फ करण्याची विरोधी पक्षांचीही मागणी असल्याचे सांगितले.
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या गोंधळातच स्पष्ट केले की, यासाठी विधान परिषदेने सर्वपक्षीय समिती नेमली होती. त्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेही सदस्य होते. त्यामुळे आता या पक्षांना निलंबन मागे घेण्यास विरोध करण्याचा कुठलाही अधिकार नाही. त्यामुळे आता त्यावर राजकारण करता येणार नसून या ठरावावर किमान एक वर्षे कोणतीही दुरुस्ती करता येणे शक्य नसल्याचे त्यांनी गोंधळातच सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. तरीही शिवसेनेच्या सदस्यांनी गोंधळ तसाच सुरू ठेवल्याने अखेर अध्यक्ष बागडे यांनी सभागृहाचे कामकाज अर्ध्या तासासाठी पुन्हा तहकूब केले. या वेळी भाजपाचे सदस्य धनंजय मुंडे यांच्या निलंबनाच्या मागणीवरून आक्रमक झाले व त्यांनीही वेलमध्ये धाव घेतली. त्या गदारोळात कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आले. ते पुन्हा सुरू झाले, पण तरीही गोंधळ कायम राहिल्याने अध्यक्षांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.
आॅडिओ क्लिपच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमा - मुख्यमंत्री
वृत्तवाहिन्यांवर दाखविण्यात आलेल्या वादग्रस्त सीडीवरून चर्चा सुरू आहे. हा विषय गंभीर आहे. कोणाची बाजू खरी हे तपासणे आवश्यक आहे. विधिमंडळाच्या कामकाजाबाबत जनतेचा चुकीचा दृष्टिकोन निर्माण होऊ नये ही जबाबदारी आपली आहे. विधिमंडळाची शान राखली गेली पाहिजे.
सीडीची फॉरेन्सिक व व्हॉइस टेस्टिंग होईलच, पण या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, विधान परिषदेचे सभापती, विधान परिषदेचे सभागृह नेते यांची उच्चस्तरीय चौकशी नेमण्यात यावी, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षांना केली.
राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावास पाठिंबा दर्शविला आणि पुढील कामकाज सुरू करण्याची विनंती केली. मात्र तरीही भाजपा, शिवसेनेच्या सदस्यांनी गोंधळ सुरूच ठेवल्याने अध्यक्षांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.