महाराष्ट्रावर संकटांची संक्रांत ! एकाच दिवशी पाच अपघात, विविध घटनांमध्ये १५ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 05:09 AM2018-01-14T05:09:42+5:302018-01-14T05:09:59+5:30
राज्यात शनिवार हा अपघातांचा वार ठरला. जत्रेतील फडात कुस्ती खेळून शुक्रवारी रात्री परतणाºया पहिलवानांच्या जीपला अपघात झाला. त्यात पाच कुस्तीपटूंचा मृत्यू झाला. त्यानंतर दिवसभरात वेगवेगळ्या मोठ्या अपघांतात एकूण १५ जणांचा मृत्यू झाल्याने संक्रांतीआधीच्या दिवशी घातवाराने महाराष्ट्र घायाळ झाला.
मुंबई : राज्यात शनिवार हा अपघातांचा वार ठरला. जत्रेतील फडात कुस्ती खेळून शुक्रवारी रात्री परतणाºया पहिलवानांच्या जीपला अपघात झाला. त्यात पाच कुस्तीपटूंचा मृत्यू झाला. त्यानंतर दिवसभरात वेगवेगळ्या मोठ्या अपघांतात एकूण १५ जणांचा मृत्यू झाल्याने संक्रांतीआधीच्या दिवशी घातवाराने महाराष्ट्र घायाळ झाला.
सांगली जिल्ह्यात वांगी (ता. कडेगाव) येथे शुक्रवारी रात्री ११.३० वा. जीप व ट्रॅक्टरच्या टकरीत पाच तरुण पहिलवान व चालक जागीच ठार झाले तर सात जण गंभीर जखमी झाले. कुंडल (ता. पलूस) येथील क्रांती कुस्ती केंद्रात सराव केल्यानंतर ते रात्री घरी परतत होते.
दुसºया घटनेत सकाळी ११ वाजता ओएनजीसीच्या कर्मचा-यांना घेऊन
जाणारे पवनहंस हेलिकॉप्टर डहाणूजवळील समुद्रात कोसळले. त्यात सहा जणांचा
मृत्यू झाला तर एकजण बेपत्ता झाला आहे. नौदल आणि तटरक्षक दलाच्या मदतीने त्याचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. जुहू येथून
उड्डाण केल्यानंतर ३० सागरी मैलांवर हेलिकॉप्टरचा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला.
मदतीसाठी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. तर डहाणूच्याच समुद्रात सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांची बोट बुडून तीन विद्यार्थिनींना जिवाला मुकावे लागले. २७ विद्यार्थी बचावले. विद्यार्थ्यांचा एक गट सेल्फी काढत असताना एकाच बाजूला भार आल्याने बोट उलटली. या बोटीचा मालक धीरज गणपत अंभिरे, चालक पार्थ धीरज अंभिरे आणि खलाशी महेंद्र गणपत अंभिरे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती अप्पर पोलीस अधिक्षक योगेश चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना दिली.
डहाणूत बोट बुडून ३ विद्यार्थिनींचा मृत्यू
डहाणू (पालघर) : येथील के. एल. पोंदा कनिष्ठ महाविद्यालयातील सहलीसाठी गेलेल्या अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची बोट समुद्रात उलटल्याने जान्हवी हरेश सुरती, सोनल भगवान सुरती आणि संस्कृती सूर्यकांत मायवंशी यांचा मृत्यू झाला.
९ विद्यार्थ्यांनी पोहत किनारा गाठला, तर २१ विद्यार्थ्यांना समुद्रातून बाहेर काढण्यात तटरक्षक दलाला यश आले. बोटीच्या वरच्या भागात मुले सेल्फी काढत असताना एकाच बाजूला भार आल्याने ती उलटली.
९ विद्यार्थ्यांना पोहता येत असल्याने त्यांनी इतरांना वाचविले. मच्छीमारांच्या बोटीही मदतीस आल्या. तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरने २१ विद्यार्थ्यांना बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती डहाणूच्या प्रांताधिकारी आंचल गोयल यांनी दिली. काही विद्यार्थी समुद्रात अडकल्याची शक्यता असल्याने शोधकार्य सुरू होते. या प्रकरणी बोटीचा मालक, खलाशी तसेच नाविकाला अटक करण्यात आली आहे.
सांगलीत अपघात, ५ पहिलवान दगावले
वांगी (जि. सांगली) : औंधच्या जत्रेतील कुस्तीचे मैदान करून परतणाºया पहिलवानांच्या जीपला ट्रॅक्टर-ट्रॉलीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाच उभरत्या पहिलवानांचा करुण अंत झाला. मध्यरात्रीच्या सुमारास वांगीजवळ (ता. कडेगाव) हा अपघात झाला.
मृत पहिलवान कुंडल (सांगली) येथील क्रांती कुस्ती केंद्रात सराव करीत होते. ७ पहिलवान गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. चालकाचाही मृत्यू झाला.
विजय शिवाजी शिंदे, आकाश दादासाहेब देसाई, शुभम अंकुश घार्गे, सौरभ अजित माने, अविनाश सर्जेराव गायकवाड, जीपचालक रणजित दिनकर धनवडे अशी मृतांची नावे आहेत. अजय कासुर्डे, अनिकेत जाधव, अनिकेत गावडे, रितेश चोपडे, अनिल पाटील, प्रतीक निकम, तुषार निकम हे सात पहिलवान गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ट्रॅक्टरचालक दिनकर तुकाराम पवार हा फरार झाला आहे.
मुंबईच्या समुद्रात हेलिकॉप्टर कोसळले; ६ ठार, १ बेपत्ता
मुंबई : ओएनजीसीच्या कर्मचाºयांना घेऊन जाणारे पवनहंसचे हेलिकॉप्टर (डाऊफिन एएस ३६५ एन ३ चॉपर २) सकाळी ११ वाजता डहाणूजवळील समुद्रात कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला तर एकजण बेपत्ता आहे. जुहू येथून उड्डाण केल्यानंतर ३० सागरी मैलांवर हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला.
त्यानंतर तब्बल साडेतीन तासांच्या शोधकार्यानंतर हेलिकॉप्टर समुद्रात सापडले. दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये एम. सर्वन्न, व्ही. के. बिंदू, जोस अॅन्टोनी, पंकज गर्ग, पी. श्रीनिवासन हे पाच अधिकारी व कॅप्टन कटोच आणि कॅप्टन व्होटकर हे दोघे पायलट होते.
सहा जणांचे मृतदेह हाती लागले असून, एकाचा शोध सुरू आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी हेलिकॉप्टर दुर्घटनेत जीव गमावलेल्या अधिकाºयांच्या कुटुंबाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.
मुंबई विमानतळाच्या इमारतीत आग
मुंबई : सांताक्रुझ विमानतळाच्या इमारतीत दुपारी आग लागली. अग्निशमन दलाने आगीवर तातडीने नियंत्रण मिळवले. त्यात जीवितहानी झाली नाही. टर्मिनल १ बी मधील कॉन्फरन्स हॉलला आग लागली. तळमजल्याच्या सेरिमोनिअल लाउंज भागात आग पसरली. सव्वातीनच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. दुर्घटनेत विजेच्या वायर, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, लाकडी फर्निचर आदी सामानाचे नुकसान झाले. आगीच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.