मराठवाडयातील पिके संकटात
By Admin | Published: October 4, 2016 05:29 AM2016-10-04T05:29:55+5:302016-10-04T05:29:55+5:30
सातत्याने दुष्काळाशी सामना करणाऱ्या मराठवाड्यावर यंदा वरुणराजाने कृपा केली असली तरी, अतिवृष्टीमुळे तब्बल १५ लाख हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकावर पाणी पडले आहे.
अतुल कुलकर्णी, मुंबई
सातत्याने दुष्काळाशी सामना करणाऱ्या मराठवाड्यावर यंदा वरुणराजाने कृपा केली असली तरी, अतिवृष्टीमुळे तब्बल १५ लाख हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकावर पाणी पडले आहे. या ‘ओल्या’ संकटामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर जणू आभाळच कोसळले आहे.
औरंगाबाद येथे ४ आॅक्टोबर रोजी मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून मराठवाड्यातील पीक परिस्थितीचा प्राथमिक अहवाल मागवला गेला. त्यातून ही आकडेवारी समोर आली असून मंत्रीमंडळ बैठकीत यावर कोणता निर्णय होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात परतीच्या पावसाने कहर केल्याने काढणीस आलेली सोयाबिन, तूर, कापूस आदी पिके पाण्यात गेली आहेत. सोयाबिनच्या शेंगा जागेवरच फुटत असून तूर पिवळी पडली आहे, असे कृषी विभागाने सरकारला कळवले आहे.
परतीच्या पावसामुळे कापूस, मका, सोयाबीन, उडीद, बाजरी, तूर, कांदा, ज्वारी अशा अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून येत्या दोन दिवसात या भागात आणखी पाऊस होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे पाऊस थांबल्यावर केले जातील, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले आहे. जर पंचनामे नंतर होणार असतील आणि नुकसानीची स्पष्टता येणार नसेल तर मंत्रिमंडळ बैठकीत कशाच्या आधारावर निर्णय घेतले जातील, असा सवाल केला जात आहे.
अशी झाली पिकाची हाणी
जिल्हा क्षेत्र/हेक्टर बाधित पिके
औरंगाबाद५४२०कापूस, मका, सोयाबिन
जालना४४९४कापूस, सोयाबिन, उडीद
बीड४,६९,३११बाजरी, सोयाबिन, तूर, कापूस, उडीद, ज्वारी
लातूर५,०५,३४०बाजरी, सोयाबिन, तूर, कापूस, उडीद, ज्वारी
उस्मानाबाद२,९४,६७६सोयाबिन, तूर, ज्वारी, बाजरी, भात, मका,
भूईमूग, सूर्यफूल, तीळ, कापूस
नांदेड१,५१,६१७सोयाबिन, कापूस, ज्वारी, हळद, तूर
परभणी५८,५३८सोयाबिन, तूर, कापूस, उडीद, भाजीपाला
हिंगोली१४९सोयाबिन व हळद