गाेड्या पाण्यातील ‘वाघा’च्या अस्तित्वावरचे संकट टळले; ‘महाशीर’ला वाचवण्याच्या प्रयत्नांना यश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 07:37 AM2021-06-13T07:37:21+5:302021-06-13T07:37:33+5:30
लोणावळा, वाळवण येथील मत्स्योत्पादन केंद्राने पन्नास वर्षांत मत्स्य विभागांच्या मदतीने विविध राज्यांना १६.५० लाख महाशीर बीज पुरवले.
सचिन लुंगसे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गोड्या पाण्यातील वाघ म्हणून ओळख असलेला महाशीर मासा इंद्रायणी नदीमधून कायमचा नाहीसा होईल, अशी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, त्याच्या संवर्धनासाठीच्या प्रयत्नांना यश येत आहे.
लोणावळा, वाळवण येथील मत्स्योत्पादन केंद्राने पन्नास वर्षांत मत्स्य विभागांच्या मदतीने विविध राज्यांना १६.५० लाख महाशीर बीज पुरवले. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, हरियाणा, पंजाब, ओडिशा, गोवा, राजस्थान, आंध्र प्रदेश, सिक्कीम, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र स्टेट अँगलिंग असोसिएशन, भोपाळ फिश फेडरेशन, वाइल्डलाइफ असोसिएशन ऑफ साऊथ इंडिया इत्यादींचा समावेश आहे. परिणामी आता या माशाचे संवर्धन होत आहे.
हिमालय व सह्याद्री पर्वतरांगांमध्ये उगम पावणाऱ्या नद्यांमध्ये महाशीर मोठ्या प्रमाणात आढळून येत असे; पण नंतर त्यांची संख्या वेगाने कमी होऊ लागली. नद्या, तलावांमध्ये कारखान्यांमधून सोडले जाणारे सांडपाणी व त्यामुळे दूषित हाेणारे वातावरण, अनियंत्रित मासेमारी, अंडी व पिलांचीही मोठ्या प्रमाणावर शिकार, मोठमोठ्या प्रकल्पांची उभारणी अशा कारणांमुळे महाशीर संकटात सापडला. ‘नामशेष होणार असलेला गोड्या पाण्यातील मासा,’ अशी आययूसीएनने त्याची नोंद केली.
त्यानंतर केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्थेने महाशीरचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्याच्या संवर्धनाचा प्रस्ताव टाटा पॉवरकडे मांडला. त्याला मान्यता मिळाली. लोणावळा येथे वाळवण धारण प्रकल्पाजवळ केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्थेच्या सहयोगाने महाशीर प्रजनन केंद्र स्थापन करण्यात आले. यामध्ये निळे कल्ले असलेल्या आणि सर्वाधिक लक्षवेधी अशा सोनेरी महाशीरवर लक्ष केंद्रित करण्यात आले. गेली ५० वर्षे केंद्राने मौल्यवान प्रजातींच्या संख्या वृद्धीसाठी मदत, संकल्पना आणि अभिनव उपक्रम राबवले आहेत.
तलाव, नद्यांमधील महाशीरची संख्या वाढणे गरजेचे!
महाशीर हा मासा आता धोकादायक स्थितीतील प्रजातींच्या यादीमधून बाहेर आलेला असला तरी प्रजनन कार्यक्रम सुरूच राहील. कारण तलाव व नद्यांमधील त्याची संख्या वाढली पाहिजे. हा मासा जेव्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये स्वतःहून प्रजनन करू लागेल तेव्हा अशा उपक्रमांना यश येईल, असे तज्ज्ञांनी सांगितले.
* १९७० साली झाली प्रकल्पाची सुरुवात
धोका असलेल्या महाशीर माशाच्या संवर्धनासाठी १९७० साली प्रकल्पाची सुरुवात झाली. राज्यांच्या मत्स्य विभागांच्या मदतीने माशांना पुन्हा शुद्ध, स्वच्छ, प्रदूषित नसलेल्या पाण्यामध्ये सोडणे हे आव्हान आहे. लोणावळा येथील मत्स्योत्पादन केंद्रामध्ये एकावेळी ५ लाख महाशीर पिले निर्माण करण्याची क्षमता आहे. दरवर्षी जवळपास ४ ते ५ लाख महाशीर पिले उत्पादनाचे उद्दिष्ट असून महाशीर माशांच्या संख्येत हळूहळू वाढ हाेत आहे.