पाण्याची पातळी कमी झाल्याने गावावर संकट
By Admin | Published: April 8, 2017 01:52 AM2017-04-08T01:52:00+5:302017-04-08T01:52:00+5:30
निरनिमगावात पिण्याच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने गावावर बिकट संकट आल्याचे चित्र निर्माण झाले
नीरा-नृसिंहपूर : निरनिमगावात पिण्याच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने गावावर बिकट संकट आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जनावरांना पिण्यासाठी पाणी न मिळाल्याने गावात जवळपास ७ शेळ्यांचा पाण्यावाचून तडफडून मृत्यू झाल्याचे वास्तव आहे.
पाण्याअभावी रखमाबाई सोपान वाघमोडे यांच्या दोन शेळ्यांचा तडफडून मृत्यू झाला. तसेच, बाबासो हेगडे यांच्या तीन शेळ्यांचा व सेसाबाई मजगे यांच्या दोन शेळ्यांचा उन्हाची तीव्रता वाढल्याने पिण्यास पाणी न मिळाल्याने तडफडून मृत्यू झाला. या मृत्यू झालेल्या शेळ्यांची कुठल्याही प्रकारची खबरदारी व पंचनामा न केल्याचे दिसून आले आहे. प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची दखल घेतली नाही, अशी माहिती या शेळीमालकांनी दिली. ही माहिती समजताच माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी निरनिमगावला भेट दिली. शेळीमालकांना भेट देऊन त्यांना नुकसानभरपाईसाठी आर्थिक मदत केली. तसेच, तातडीने गावामध्ये पाण्याचा टँकर चालू करण्याचे आश्वासन दिले. या वेळेस त्यांनी नीरानदीचे पाहणी केली. निरा नदी कोरडी पडल्याने गावातील लोकांवर बिकट दिवस आले आहेत. तसेच जनावरांना चाऱ्याचे हाल चालले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी पाटील यांच्याकडे व नीरा नदीवर मिनी बंधारा बांधण्यासाठी मागणी केली आहे. या वेळी मनोज पाटील, प्रताप पाटील, तलाठी, एस. टी. यादव, ग्रामसेवक आंबिका पावसे, काशिनाथ पवार, बापू महानवर, रघुनाथ पाटील, लालासो महानवर, रामचंद्र जाधव, अजय पाटील, गोळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
उन्हाची तीव्रता वाढल्याने सर्व बोर, विहिरी, तलाव, आड यांचे पाणी आटले आहे. दोन ते तीन किलोमीटरवरून महिला व लहान मुलांना पायपीट करून व जीव धोक्यात घालून विहिरीतून ७० ते ८० फुटांवरून पाणी काढावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर व जनावरांना चाऱ्यासाठी छावण्या चालू करण्याची ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.
तसेच, इंदापूर तालुक्यात पाणीटंचाईमुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीरतेने भेडसावत आहे. नीरा डावा, खडकवासला कालव्यातून पाणी सोडून नीरा नदीवरील बंधारे भरण्याची मागणी पाटील यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली. (वार्ताहर)