कुरकुंडीत तिहेरी हत्याकांड

By admin | Published: March 29, 2017 12:28 AM2017-03-29T00:28:11+5:302017-03-29T00:28:11+5:30

खेड तालुक्यातील कुरकुंडी येथे कौटुंबिक वादातून तिहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना घडली आहे. मित्रांच्या मदतीने

Crisp Triple massacre | कुरकुंडीत तिहेरी हत्याकांड

कुरकुंडीत तिहेरी हत्याकांड

Next

पाईट : खेड तालुक्यातील कुरकुंडी येथे कौटुंबिक वादातून तिहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना घडली आहे. मित्रांच्या मदतीने वडील, सावत्रआई व सावत्र बहिणीची निर्घृण हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी घराजवळील चरामध्ये एकावर एक तीनही मृतदेहांवर शेणखत टाकून गाडून टाकले.
दीपक रोहिदास गोगावले (वय २१ ) याने हे हत्याकांड केले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
कुरकुंडी येथील राळेवस्तीजवळील येथील यात्रा कमिटीचे माजी अध्यक्ष रोहिदास बाळू गोगावले (वय ४५), त्यांची पत्नी मंदा रोहिदास गोगावले (वय ४०) व मुलगी अंकिता रोहिदास गोगावले (वय १२) शनिवारपासून (दि. २५) बेपत्ता होते. याबाबत शेजाऱ्यांनी मंदा हिच्या वडिलांना सांगितले. त्यांनी चाकण पोलिसांना कळविले.
पोलिसांनी चौकशी केली असता, घरासमोरील पडवीमध्ये रक्ताचे डाग दिसून आले. यावरून हा घातपात असल्याचा संशय पोलिसांना आला. मात्र मृतदेह न मिळाल्याने नेमक्या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले नाहीत.
मंगळवारी सकाळी घरापासून १०० फूट अंतरावर एका मृतदेहाचा एक हात दिसून आला. तेव्हा पोलिसांनी त्या ठिकाणीच शोध घेतला. एक महिला व पुरुष असे दोन मृतदेह असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. परंतु तहसीलदार किंवा तत्सम कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पंचनामा करावयाचा असल्याने ते येईपर्यंत मृतदेह त्या ठिकाणाहून बाहेर काढले नाहीत. दरम्यान, तिसऱ्या मृतदेहाबाबत काय झाले असेल? याबाबत अनेक तर्क वाढविले जात होते. परंतु जेव्हा मृतदेह बाहेर काढण्यात आले, तेव्हा तिसरा मृतदेहही तिथे सापडला.
दरम्यान, पोलिसांनी यांचे जवळचे नातेवाईक कोण आहेत, याबाबत चौकशी केली असता रोहिदास गोगावले यांना पहिली पत्नी होती. तिला दोन मुले होती. दीपक व शुभम अशी त्यांची नावे असल्याचे समोर आले. पोलिसांनी या दोघांना येथे बोलावून घेतले. चौकशी केली असता, दीपक येथे येऊन गेल्याचे समजले. अधिक चौकशी केली असता दीपक उडवाउडवीची उत्तरे देत होता. पोलिसांनी जाब विचारल्यानंतर त्याने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अपर पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे, चाकण पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी तातडीने घटनास्थळास भेट दिली. नायब तहसीलदार लता वाजे यांच्यासमक्ष मृतदेह काढण्यात आले.
संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश मुंडे, अनिल पाचपुते, सी. गवारी, अजय भापकर आदी तपास करीत आहेत. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

निर्घृण कृत्य
रोहिदास याचा एक हात पंजापासून तुटलेला होता, तर डोक्यावर, हातावर तीक्ष्ण हत्याराने वार केले होते. पत्नी मंदा व मुलगी अंकिता यांच्या हातावर, डोक्यावर मारहाणीच्या खुणा दिसत होत्या. महिलांच्या  डोक्यावरील  केस कापण्यात आले होते.

पोलिसांचा तपास सुरू : खऱ्या कारणांचा शोध
या कुटुंबाला एकत्रितपणे इतक्या निर्घृणपणाने का संपवले असावे याची खरी कारणे अद्याप समोर आलेली नाहीत. त्या दिशेने पोलिस तपास करीत आहेत. परंतु अद्याप नेमके कारण उ़घड झालेली नाही. मात्र कौटुंबिक वादातूनच हे खून
झाले असल्याचा संशय आहे. हत्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीदेखील
आरोपी दीपक गोगावले हा त्यांच्या घरी आलेला होता. तो त्यांच्या घरी कधीही फारसा येत नसे. त्याने घरातील गाईंना चारादेखील खाण्यासाठी दिला. परंतु तो त्या ठिकाणी काही पुरावे सुटलेले नाहीत ना याची शहानिशा करण्यासाठी आलेला असावा असा पोलिसांना संशय आहे.

Web Title: Crisp Triple massacre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.