ब्रिटिशांच्या खुशीसाठी टीका
By Admin | Published: February 16, 2015 04:00 AM2015-02-16T04:00:44+5:302015-02-16T04:00:44+5:30
इंग्लंडमधील नागरिकांना खूश करण्यासाठी सलमान रश्दी भारतीयांविषयी वक्तव्य करतात, अशा शब्दांत ज्ञानपीठ विजेते ‘कोसला’कार डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबई : इंग्लंडमधील नागरिकांना खूश करण्यासाठी सलमान रश्दी भारतीयांविषयी वक्तव्य करतात, अशा शब्दांत ज्ञानपीठ विजेते ‘कोसला’कार डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बुकर विजेते वादग्रस्त लेखक सलमान रश्दींनी काही दिवसांपूर्वी टिष्ट्वटरच्या माध्यमातून ‘नेमाडेंसारख्या वृद्ध माणसाने गुपचूप पुरस्कार स्वीकारून आभार मानावेत’, अशा शब्दांत टीका केली होती. रश्दी यांच्या टीकेचा नेमाडेंनी आपल्या खास शैलीत खरपूस समाचार घेतला.
नेमाडे यांना साहित्य श्रेत्रातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर रश्दी यांनी त्यांनी
इंग्रजी भाषेबाबत केलेल्या वक्तव्यावर टीका केली होती. त्याचे पडसाद साहित्य क्षेत्रात उमटत असताना भालचंद्र नेमाडे यांनी आज प्रत्युत्तर दिले. (प्रतिनिधी)
असे बोलणे बालीशपणाचे : मी जे लिहिले आहे, ते सत्य आहे. जर कोणी पुरस्कार परत करण्याची भाषा करत असेल, तर त्यांनी अगोदर पुरस्कार परत करावेत. आता असे बोलणे हे बालीशपणाचे लक्षण आहे, अशा शब्दांत नेमाडेंनी त्यांच्या प्रतिक्रियेबाबत उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्यांना टोला लगावला.
१.ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे यांना जाहीर झालेला ज्ञानपीठ पुरस्कार हा महाराष्ट्राचा गौरव आहे़ समस्त जनतेसाठी ही अभिमानाची बाब आहे, अशा शब्दांत भावना राज्यपाल विद्यासागर राव यांनी त्यांची प्रशंसा केली. यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राज्यपालांनी नेमाडे यांना चहापानासाठी राजभवनात निमंत्रित केले होते. या वेळी राज्यपालांनी शाल व श्रीफळ देऊन नेमाडे यांचा सपत्निक सत्कार केला.
२.विशेष निमंत्रणावरून राजभवनात दाखल झालेल्या नेमाडे कुटुंबीयांचे राज्यपालांनी सपत्निक स्वागत केले. आपला ज्ञानपीठ हा महाराष्ट्राचा गौरव असल्याची भावना राज्यपालांनी व्यक्त केल्या. यावर राज्याच्या प्रथम नागरिकाकडून सत्कार होतोय, हा आपल्याकरिता बहूमान असून त्यासाठी आपण आभारी आहोत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी नेमाडे यांनी कोसला या आपल्या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद असलेली ‘ककून‘ ही कादंबरी राज्यपालांना भेट दिली.
३.राज्यपाल आणि नेमाडे यांच्यात या वेळी हैदराबाद मुक्तीसंग्राम, मराठवाड्यातील आठवणी, साहित्य, शिक्षण क्षेत्रातील स्थित्यंतरे आदी विषयांवर चर्चा झाली. याप्रसंगी राज्यपालांच्या पत्नी विनोदा, नेमाडे यांच्या पत्नी प्रतिभा तसेच पुत्र जनमेजय, स्नुषा व नाती उपस्थित होत्या. दरम्यान,रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनीही आज राज्यपालांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.