सर्व स्तरातून टीका झाल्याने नव्या संख्यावाचन पद्धतीचा होणार फेरविचार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 02:48 AM2019-06-21T02:48:56+5:302019-06-21T02:49:05+5:30
सरकारचे पाऊल मागे; तज्ज्ञ समिती नेमण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई : संख्यावाचनाच्या नव्या पद्धतीवरून टीकेचे सूर उमटत असतानाच त्या बाबत फेरविचार करण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिले. सभागृहाचे आक्षेप असतील तर तज्ज्ञांची समिती नेमण्यात येईल. या समितीकडून पद्धतीचा अभ्यास होईल व शिफारशीवर विचार करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. विरोधी पक्षांच्या संख्यावाचनाबाबतच्या मुद्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, एससीईआरटीने याबाबत तज्ज्ञांची समिती नेमली होती.या समितीने मुलांच्या अध्ययन क्षमतेचा अभ्यास करून नवीन अभ्यासक्रमात बदल सुचविले.बोलायला काय सोपे पडेल? लक्षात पटकन कशा पद्धतीने येईल? याबाबत सुधारणा सुचविल्या. त्यात वीस अधिक दोन लिहिले आहे पण पुढे बावीस असाही उल्लेख आहे.ही पद्धत का अवलंबिली याबाबत या तज्ञांनी स्पष्ट देखील केले आहे,पण सभागृहाची जर भावना असेल तर तज्ज्ञांची समिती नेमू व समितीकडून शिफारशी मागवून त्याचा विचार करू असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दादा, छगन कमळ बघ
संख्यानामावरून सध्या सगळीकडे फिरत असलेला एक व्हॉटस्अॅप जोक अजित पवार यांनी बुधवारी सभागृहात सांगितला होता. फडणवीस यांच्या आडनावाचा उच्चार आता, फडण दोन शून्य असा करायचा का असा चिमटा त्यांनी काढला होता. मुख्यमंत्र्यांनी आज त्याची परतफेड केली. पहिलीच्या बालभारतीतीत पुस्त्काचे उतारे त्यांनी वाचून दाखविले.आई कमळ बघ,दादा कमळ बघ, छगन कमळ बघ, शरद गवत आण, हसन पटकन उठ असे उतारे त्यांनी वाचून दाखविले तेव्हा सभागृहात हशा पिकला.