टीका करा; पण शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या
By admin | Published: May 1, 2017 04:31 AM2017-05-01T04:31:36+5:302017-05-01T04:31:36+5:30
महाराष्ट्रात विरोधकांचा सन्मान राखण्याची परंपरा असताना, विरोधकांबद्दल ‘कोडगे’ आणि ‘निर्लज्ज’ असे शब्द वापरून मुख्यमंत्र्यांना आनंद
मुंबई : महाराष्ट्रात विरोधकांचा सन्मान राखण्याची परंपरा असताना, विरोधकांबद्दल ‘कोडगे’ आणि ‘निर्लज्ज’ असे शब्द वापरून मुख्यमंत्र्यांना आनंद मिळत असेल, तर आमची हरकत नाही. आमच्याबद्दल काहीही वाईट बोला, पण शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण पत्रकारांशी बोलताना केले.
चिंचवड येथील भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या संघर्ष यात्रेवर टीका करताना, विरोधकांबद्दल ‘कोडगे’ आणि ‘निर्लज्ज’ असे असंसदीय शब्द वापरले होते. त्यावर खा. चव्हाण म्हणाले, ‘गेल्या ५७ वर्षांच्या इतिहासात कोणत्याही मुख्यमंत्र्याने विरोधकांबद्दल अशी असंसदीय भाषा वापरली नाही. फडणवीस यांना असे शब्द वापरून आनंद मिळत असेल, तर त्यांच्याकडून यापेक्षा वाईट शब्द ऐकण्याची आमची तयारी आहे. राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. गेल्या अडीच वर्षात साडेनऊ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. एकाही शेतमालाला हमीभाव मिळत नाही.’ राज्यात तूर उत्पादक शेतकरी गेल्या कित्येक दिवसांपासून घरदार सोडून खरेदी केंद्राबाहेर रांगेत उभा आहे. शेतकऱ्यांची इतकी वाईट परिस्थिती असताना, मुख्यमंत्री मूग गिळून गप्प बसले आहेत. (विशेष प्रतिनिधी)
शेवटचा दाणा खरेदी होईपर्यंत तूर खरेदी केंद्र सुरू राहतील, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता. तुमच्या शब्दावर विश्वास ठेवणाऱ्या शेतकऱ्यांची फसगत झाली आहे. तेव्हा शेतकऱ्यांची सर्व तूर खरेदी करून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी,
- खा. अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष