पिकांमध्ये वाढला ९५ टक्के तणनाशकांचा वापर!
By admin | Published: July 6, 2016 01:19 AM2016-07-06T01:19:30+5:302016-07-06T01:19:30+5:30
शास्त्रोक्त पद्धतीअभावी नुकसान; पंदेकृवि देणार तणनाशक वापरासंबंधी प्रशिक्षण.
अकोला : किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगामुळे पिकांचे जेवढे नुकसान होते, त्यापेक्षा जास्त नुकसान तणामुळे होत असल्याने विदर्भातील आत्महत्याप्रवण जिल्हय़ांतील शेतकर्यांनी काही वर्षांपासून तणनाशकांच्या वापरावर भर दिला आहे; जवळपास ८0 टक्केच्यावर शेतकरी पिकात तणनाशकांचा वापर करतात. परंतु, तणनाशकाची नेमकी मात्रा न वापरल्याने शेतकर्यांना तणावर नियंत्रण मिळवता आले नसल्याचा धक्कादायक निष्क र्ष समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामार्फत शेतकर्यांना तणनाशक वापरासंबंधी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सुरुवातीला गव्हाच्या पिकासह इतर पिकावर तणनाशक वापरण्यासंबंधी कार्यशाळेच्या माध्यमातून शेतकर्यांना प्रशिक्षण देण्याची शिफारस राज्यस्तरीय संशोधन सल्लागार आढावा समिती (जॉइंट अँग्रोस्को) कडे केली होती. ती शिफारस मान्य झाली असून, आता इतर पिकांवरील तणनाशक वापरासंबंधीचे प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे. मजुरीचे वाढते दर, मजुरांची टंचाई आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे सोयाबीनचे उत्पादन घेणार्या शेतकर्यांनी तणनाशकांचा वापर सुरू केला आहे. या तंत्रज्ञानाद्वारे प्रभावी तणनियंत्रण होण्यासाठी अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी या अगोदरच महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत. त्यांच्या या शिफारशींना संयुक्त संशोधन आढावा परिषदेची मान्यताही मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर गहू पिकासाठी तणनाशकांचा योग्य वापर करण्यासाठी मान्यता मिळाली असून, शेतकर्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पश्चिम विदर्भात तणनाशकांचा वापर अधिक या विद्यापीठाने गतवर्षी विदर्भातील शेतकरी आत्महत्याप्रवण अकोला, वाशिम, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या सहा जिल्ह्यांमधील सोयाबीन उत्पादक शेतकर्यांच्या मुलाखती घेतल्या. त्याकरिता तालुके व गावं निवडण्यात आली होती. तणनाशक वापरासंबंधी असलेले ज्ञान, त्याचा अवलंब आदींबाबत या शेतकर्यांकडून माहिती घेण्यात आली. सोयाबीनबाबत शिफारस केली असली, तरी गहू या पिकात शेतकरी तणनाशकांचा वापर करीत आहेत; पण त्याचा वापर तंत्रशुद्ध पद्धतीने होत नसल्याने ५0 टक्केच्या जवळपास नुकसान होत आहे.