१०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान
By admin | Published: March 17, 2017 08:50 PM2017-03-17T20:50:19+5:302017-03-17T20:50:19+5:30
अवकाळी पावसाच्या तडाख्यात तालुक्यातील १०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तालुक्यातील नुकसानीचा सर्व्हे करण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
बार्शीटाकळी तालुक्यात नुकसानीचा सर्व्हे सूरु
सायखेड : बार्शीटाकळी तालुक्याला १६ मार्च रोजी दुपारी अचानक वादळासह झालेल्या जोरदार पावसाने झोडपले होते. चोहोगाव शेतशिवारात लिंबाच्या आकाराची गारपीट झाल्याने रब्बीसह काढणीला आलेल्या पिकांचे व फळबागांचे अतोनात नुकसान झाले.अवकाळी पावसाच्या तडाख्यात तालुक्यातील १०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तालुक्यातील नुकसानीचा सर्व्हे करण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
बार्शीटाकळी तालुक्यात चोहोगाव, धाबा, चिंचोली रुद्रायणी, लोहगड, सायखेड व कोथळी खुर्द येथे गुरूवारी गारपीट झाली होती, तर महान, पुनोती, मांगुळ, मिर्झापूर, निंबी चेलका, सुकळी, राजनखेड, जामवसू आदी गावांमध्ये वादळासह जोरदार पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक नुकसान चोहोगाव शिवारात झाले होते. धाबा येथील मुख्य चौकात असलेल्या झाडावर वीज कोसळली. लोहगड येथील एका नवसाचे रोडग्याचे जेवण आटोपून घरी येताना वादळी पावसामुळे वासुदेव जाधव यांच्या शेतातील घरात काही जण थांबले होते. तितक्यात मुंडालीसह घराचे छत कोसळले. यामध्ये तुळशीराम पवार, राजेश चव्हाण, मंगेश जाधव, ऋषिकेश राठोड आदी गंभीर जखमी झाले होते.
तालुक्यात गारपीट, वादळी पावसामुळे कांदा, गहू, हरभरा, निंबू आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचा मंडळ निहाय तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायक यांच्या संयुक्त पथकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष शेतात जाउन सर्व्हे करण्याच्या कामास शुक्रवारी सुरूवात करण्यात आली. शेतातील नुकसानीचा प्रत्यक्ष भेट देउन संयुक्तपणे अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार आहे. तालुक्यातील जवळपास १०० हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे, शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. (वार्ताहर)
तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांच्या मदतीने सर्व्हे करण्यात येत आहे. या सर्व्हेचा अंतिम पाहणी अहवाल आल्यानंतर तातडीने जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे.
राजेंद्र जाधव, तहसीलदार, बार्शीटाकळी