केंद्रशासनाच्या पथकाकडून विदर्भ, मराठवाड्यात पिकावरील किडरोग सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 05:40 PM2020-10-09T17:40:39+5:302020-10-09T17:41:20+5:30
Agriculture News हे पथक २८ आॅक्टोबरपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यात विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी करणार.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : विविध पिकांवरील किडरोगांचे सर्वेक्षण करण्यासाठी केंद्रशासनाचे पथक विदर्भ, मराठवाड्याच्या दौºयावर आहे. या दौºयात ते २८ आॅक्टोबरपर्यंत विविध भागांत फिरून पिकांवरील किडरोगांचे सर्वेक्षण व अभ्यास करणार आहे. या पथकाच्या भेटीचे आणि ठिकाणांचे नियोजन काटेकोरपणे करून अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासोबत उपस्थित राहण्याच्या सुचना कृषी संचालकांनी ६ आॅक्टोबर रोजी दिल्या आहेत.
विदर्भ आणि मराठवाड्यात पिकांवर विविध किडींचा प्रादूर्भाव होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर पिकांवरील किडी कोणत्या आणि त्यांचे प्रमाण किती याचे सर्वेक्षण करून अभ्यास करण्यासाठी केंद्रशासनाचे एक पथक १ आॅक्टोबर रोजी महाराष्ट्रात दाखल झाले आहे. हे पथक २८ आॅक्टोबरपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यात विविध ठिकाणी भेटी देऊन पिकांवरील किड व रोगांची पाहणी करणार असल्याचे पत्र सीआयपीएमसी नागपूर यांच्याकडून कृषी संचालकांना पाठविण्यात आले आहे. या पत्रानुसार कृषी संचालकांनी औरंगाबाद, अमरावी आणि नागपूरच्या विभागीय कृषी सहसंचालकांना ६ आॅक्टोबर रोजी या संदर्भात माहिती देऊन संबंधित पथकाच्या भेटीच्या ठिकाणांचे नियोजन करून या पथकासह स्वत: उपस्थित राहण्याच्या सुचना दिल्या आहेत.